Asia Cup 2023 Team India Squad : आगामी आशिया चषकासाठी भारताच्या 17 जणांच्या शिलेदारांची निवड करण्यात आल आहे. या संघ निवडीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेच. काही दुखापतग्रस्त खेळाडूंचं कमबॅक झालेय. त्याशिवाय तिलक वर्मा या युवा खेळाडूला संधी दिली आहे. भारतीय संघ निवडताना फलंदाजीवर विशेष लक्ष देण्यात आल्याचे दिसतेय. वेगवान माराही जबरदस्त आहे. पण फिरकी गोलंदाजी कमवुत असल्याचे दिसत आहे. प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून फक्त कुलदीप यादव याचीच निवड करण्यात आली आहे. आर. अश्विन आणि चहल यांना स्थान दिलेले नाही. तर अष्टपैलू म्हणून रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. 


आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीमच होय. येथे खेळणारे बहुतेक खेळाडू विश्वचषकात खेळताना दिसतील. त्यामुळे आजच्या संघनिवडीकडे सर्वांची नजर होती. अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीने संतुलित संघ निवडण्याचा प्रयत्न केला. पण स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज फक्त एकच घेतला आहे. भारतीय उपखंडात सामने होत आहेत, त्यामुळे फिरकीचा दबदबा असेल. पण असे असतानाही फक्त एकच फिरकी गोलंदाज निवडला आहे. कुलदीप यादव याच्या जोडीला अष्टपैलू अक्षर पटेल आणि रविंद्र जाडेजा यांचा समावेश आहे. कुलदीप यादव दुखापतग्रस्त झाला तर स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय. 


मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून एकाच गोलंदाजाची निवड करणे म्हणजे भारताची फिरकी गोलंदाजी कमकुवत झाली, असाच अर्थ होतो. कारण, कुलदीप यादवचा बॅकअप गोलंदाज म्हणून कुणालाही संधी देण्यात आलेली नाही. या कारणामुळे आशिया चषकात भारताला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आशिया चषकात टीम इंडिया कोणत्या ११ शिलेदारासह मैदानात उतरणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.  


अक्षर पटेलला का दिली संधी ?


आशिया चषकासाठी संघात तीन फिरकी गोलंदाजी करु शकणाऱ्या खेळाडूंनाच संधी देण्यात आली. कुलदीप यादव प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. तर रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांना अष्टपैलू म्हणून स्थान दिलेय. चहल आणि अश्विन यांना संघात स्थान मिळाले नाही. याबाबत रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला.


भारतीय संघाच्या निवडीदरम्यान लेग-स्पिनर आणि ऑफ-स्पिनर दोघांसाठीही चर्चा झाली. पण आम्हाला अशा खेळाडूची निवड करायची होती ज्याच्याकडे 8 किंवा 9 क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता आहे.  अक्षरने या वर्षात आतापर्यंत कमालीची कामगिरी केली आहे. त्याला संघात घेतल्याने आम्हाला डावखुरा खेळाडूचा पर्यायही मिळतो, ज्याच्याकडे वरतीही फलंदाजी करण्याची क्षमताही आहे. निवडीच्या वेळीही आम्ही अश्विन आणि चहलबद्दल चर्चा केली होती. पण फक्त १७ खेळाडूंचा समावेश असल्याने आम्ही स्थान देऊ शकलो नाही. पण आशिया चषकात संधी मिळाली नाही म्हणजे विश्वचषकासाठी अश्विन-चहल आणि सुंदर यांची दारे बंद झाली असे नाही, असे रोहित शर्मा म्हणाला.


वेगवान गोलंदाजीतून विश्वचषकाचे चित्र स्पष्ट - 
आशिया चषकासाठी भारतीय संघात चार प्रमुख वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, आणि प्रसिद्ध कृष्णा हे चार प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. त्याशिवाय हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर हे दोन अष्टपैलू खेळाडू त्यांच्या जोडीला असतील. भारतीय संघात त्यामुळे वेगवान गोलंदाजीचे सहा पर्याय उपलब्ध आहेत. याच सहा जणांमधील पाच जण विश्वचषकाचा भाग असतील, असा अंदाज आहे. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शामी यांचे विश्वचषकातील स्थान निश्चित आहे. शार्दूल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यातील एकाची विश्वचषकात वर्णी लागेल. शार्दूल ठाकूर याचे पारडे जड दिसतेय. शार्दूल ठाकूर याने दोन वर्षात गोलंदाजीत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याशिवाय तळाला फलंदाजी करताना झटपट धावा काढण्यातही तो तरबेज आहे.  


आशिया चषकासाठी भारताचा संघ -


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)