Asia Cup Points Table : आशिया चषकात पाकिस्तान संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. 30 ऑगस्टपासून सुरु झालेल्या रनसंग्रामात आतापर्यंत चार सामने झाले आहेत. यामध्ये पाकिस्तान संघाने आपले सर्व साखळी सामने खेळले आहेत. पाकिस्तानचा संघ सुपर 4 फेरीसाठी पात्र ठारला आहे. पाकिस्तानचा संघ ग्रुप अ मध्ये पहिल्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. भारतीय संघाला सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी नेपाळविरोधात सामना जिंकवा लागणार आहे, अथवा सामना रद्द झाला तरीही भारतीय संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. पण भारताने सामना गमावल्यास स्पर्धेचे आव्हान संपुष्टात येईल. 


सहा संघांना आशिया चषकात दोन गटात विभागण्यात आले. पहिल्या गटामध्ये पाकिस्तान, भारत आणि नेपाळ यांचा समावेश आहे. या गटातून तीन गुणांसह पाकिस्तान संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळवर 238 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. अ गटामध्ये पाकिस्तानचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ एका गुणासह दुसऱ्या क्रमांकवर आहे. टीम इंडियाचा अखेरचा साखळी सामना सुरु झाला आहे. भारतीय संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करणार का ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. 


आशिया चषकातील ग्रुप ब मध्ये अटीतटीची स्पर्धा रंगली आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकला आहे. पाच तारखेला श्रीलंका आणि आफगाणिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. या सामन्यानंतरच ग्रुप ब चे चित्र स्पष्ट होईल.  ग्रुप ब मध्ये श्रीलंका सध्या पहिल्या स्थानावर आहे. बांगलादेश संघाने दोन सामन्यापैकी एक सामना जिंकलाय. बांगलादेशचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर आफगाणिस्तान तळाशी आहे. आफगाणिस्तानने अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केल्यास नेट रनरेटवर निकाल लागेल. 


नेपाळ-भारत यांच्यात पहिलाच सामना - 


नेपाळविरोधात आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. भारत आणि नेपाळ आशिया चषकातील आपला दुसरा सामना खेळत आहेत. हा सामना जिंकणारा संघ सुपर 4 साठी क्वालिफाय करणार आहे. दरम्यान,  भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये कँडी येथे सामन्याला सुरुवात झाली आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या सामन्यावरही पावसाचे संकट असल्याचे समोर आले आहे. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर कँडीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे भारत आणि नेपाळ सामना प्रभावित होण्याची शक्यता आहे.