Asia Cup 2023 Point Table : नेपाळचा दहा विकेटने पराभव करत भारतीय संघाने आशिया चषकात पहिल्या विजयाची नोंद केली. पाकिस्तानविरोधातील भारताचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. नेपाळविरोधातील सामनाही पावसामुळे प्रभावित झाला. पावसेन उसंत घेतल्यानंतर भारताला 23 षटकांत 145 धावांचे आव्हान देण्यात आले होते. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने दमदार फलंदाजी करत नेपाळचा दहा विकेटने पराभव केला. या विजयासह भारताने सुपर 4 मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. ग्रुप अ मध्ये नेपाळचे आव्हान संपुष्टात आलेय. पाकिस्तान संघ पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघाचे प्रत्येकी 3-3 गुण आहेत. पण पाकिस्तानचा नेटरनरेट सरस असल्यामुळे ते पहिल्या स्थानावर विराजमान आहेत. भारतीय संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केल्यामुळे आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
आशिया चषकातील ब ग्रुपमध्ये बांगलादेश संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. दुसऱ्या संघाचा निर्णय आज होणार आहे. आज आफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये लढत आहे. आफगाणिस्तानसाठी आजचा सामना करो या मरो असा आहे. आफगाणिस्तानला श्रीलंकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. अन्यथा ब ग्रुपमधून श्रीलंका आणि बांगलादेश संघ सुपर 4 साठी पात्र ठरतील. सुपर 4 मधील पहिला सामना पाकिस्तान आणि ग्रुप ब मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संघामध्ये लाहोर येथील गद्दाफी स्टेडिअमवर होणार आहे.
ग्रुप ब मध्ये रनरेट महत्वाचा -
ग्रुप ब मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांनी प्रत्येकी एक एक विजय मिळवला आहे. श्रीलंका संघाने बांगलादेशचा पराभव केला होता. तर बांगलादेश संघाने आफगाणिस्तानचा पराभव करत सुपर4 च्या दिशेने पाऊल टाकलेय. आज श्रीलंका आणि आफगाणिस्तान यांच्यात निर्णायक लढत होणार आहे. बांगलादेश संघाने दोन सामन्यात एका विजयासह 2 गुणांची कमाई केली आहे. पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या श्रीलंकेवर बाहेर जाण्याचे संकट ओढावलेय. आफगाणिस्तान संघाने मोठ्या फरकाने विजय मिळवला तर गतविजेत्याचे आव्हान संपुष्टात येईल. सध्याच्या घडीला श्रीलंकेचा रनरेट 0.951 इथका आहे. तर आफगाणिस्तानचा रनरेट -1.780 इतका आहे.
भारताचे सुपर 4 फेरीचे वेळापत्रक -
ग्रुप अ आणि ब मधील आघाडीचे दोन संघ सुपर 4 साठी पात्र होतील. ग्रुप अ मधून भारत आणि पाकिस्तान संघाने सुपर 4 मध्ये पात्र झाले आहेत. आज ग्रुप ब चे चित्र स्पष्ट होणार आहे. सुपर 4 मध्ये प्रत्येक संघ प्रत्येकासोबत एक एक सामना खेळणार आहे. म्हणजे, सुपर 4 मध्ये प्रत्येक संघाचे तीन सामने होणार आहेत. आघाडीच्या दोन संघामध्ये फायनलचा थरार होणार आहे. भारतीय संघाचे सुपर 4 मधील सामन्याची तारीख आता निश्चित झाली आहे. 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. दुसरा सामना 12 सप्टेंबर रोजी आणि अखेरचा लाममा 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. 12 आणि 15 सप्टेंबर रोजी होणारे सामने ग्रुप ब मधील आघाडीच्या दोन संघाविरोधात असतील.