Asia Cup 2023, Pakistan Team : रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअममध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आशिया चषकाची फायनल होणार आहे. गतविजेत्या श्रीलंका संघाने पाकिस्तानचा पराभव करत दिमाखात आशिया चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. पाकिस्तान संघाचे गुरुवारी आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आलेय. आशिया चषकातून गाशा गुंडाळल्यानंतर पाकिस्तान संघामधील अंतर्गत कलह समोर आला आहे. पाकिस्तान संघातील दोन स्टार खेळाडू भिडल्याचे वृत्त समोर आलेय. मिळालेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांच्यामध्ये ड्रेसिंग रुमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी मोहम्मद रिझवान याने मध्यस्थी केली. 


‘बोल न्यूज’ ने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार,  श्रीलंकाविरोधातील पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये बोलवले.  बाबर खेळाडूंशी त्यांच्या खराब कामगिरीबद्दल बोलत होता, मात्र वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने त्याला अडवले. तो म्हणाला की, किमान ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्यांचे कौतुक करायला हवे, असे म्हटले. बाबरला शाहीनची ही गोष्ट अजिबात आवडली नाही. पाकिस्तानी कर्णधाराने सांगितले की, त्याला माहित आहे की कोणाची कामगिरी चांगली आहे. शाहीन आणि बाबर यांच्यातील वाद खूप वाढला. अखेर त्यांचा वाद सोडवण्यासाठी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला यावे लागले. बाबरने ड्रेसिंग रूममधील खेळाडूंना सांगितले होते की ते जबाबदारीने खेळत नाहीत. यावर शाहीन आफ्रिदीने थांबवले होते. 






सुपर ४ मध्ये पाकिस्तानची खराब कामगिरी - 


आशिया चषकाच्या साखळी फेरीत पाकिस्तान संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते.  पण सुपर ४ स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी अतिशय खराब झाली. सुपर ४ फेरीत पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत तळाला राहिला. बांगलादेशचा संघही त्यांच्यापेक्षा वरती आहे. 


पाकिस्तान संघाला सुपर-4 मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला सामना जिंकला आणि त्यानंतर सलग दोन्ही सामने गमावले. भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव झाला. यानंतर संघाला डीएलएस पद्धतीने श्रीलंकेविरुद्ध २ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. भारताविरोधात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे नेटरनरेट मोठ्या प्रमाणात घसरला. त्यामुळे पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत तळाला राहिला.