Asha Bhosle Death Cricketers Emotional Reaction : भारतीय संगीत क्षेत्रातील एक महान पर्व आज संपले आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. चित्रपटसृष्टीपासून क्रीडाक्षेत्रापर्यंत सर्वच स्तरांतून दुःख व्यक्त केले जात आहे. आशाताईंच्या आवाजाचे वेड जगभरातील कोट्यवधी चाहत्यांप्रमाणेच दिग्गज क्रिकेटपटूंनाही होते. त्यांच्या जाण्याने एक पर्व संपल्याची भावना व्यक्त करत सचिन तेंडुलकरपासून ते युवराज सिंगपर्यंत अनेक दिग्गजांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

Continues below advertisement

सचिन तेंदुलकर काय म्हणाले? (Sachin Tendulkar on Asha Bhosle)

सचिन तेंदुलकर यांने लिहिले की, आजचा दिवस भारतासाठी, आणि जगभरातील संगीतप्रेमींसाठी अत्यंत दुःखद आहे. आमच्यासाठी आशा ताई म्हणजे कुटुंबच होत्या. आज या दुःखाचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. एका क्षणात हृदय निःशब्द होतं, आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी दिलेल्या असंख्य सुरांमध्ये ते हरवून जातं. असं वाटतंय जणू काळच थांबून गेला आहे. पण त्यांच्या अजरामर गाण्यांमधून त्या सदैव आपल्या सोबत राहतील. धन्यवाद ताई, आमचं आयुष्य उबदारपणा, सौंदर्य आणि अविस्मरणीय संगीताने भरून टाकल्याबद्दल. तुमची उणीव शब्दांत व्यक्त करता येणार नाही, आशा ताई.

Continues below advertisement

क्रीडाविश्वाकडून भावपूर्ण श्रद्धांजली

2007 च्या टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील हिरो युवराज सिंग याने सोशल मीडियावर भावना व्यक्त करत म्हटले की, “आशा भोसले यांच्या गाण्यांवरच मी लहानाचा मोठा झालो. आज असं वाटतंय की बालपणाचा एक भागच शांत झाला आहे.” त्यांनी आशाताईंच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली.

दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने श्रद्धांजली वाहताना म्हटले की, आशा भोसले यांच्या मधुर आवाजाने अनेक पिढ्यांची मनं जिंकली. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांची परंपरा सदैव लोकांच्या हृदयात जिवंत राहील.

युसूफ पठाण यांनीही शोक व्यक्त केला. प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी म्हटले की, “मन्ना डे, लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्या पिढीचा शेवटचा दुवा आपण आज गमावला.” तर माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी सांगितले की, आशाताईंचा सुरेल आवाज सदैव अमर राहील.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही दुःख व्यक्त करत म्हटले की, भारतीय संगीत क्षेत्रातील ही अमूल्य धरोहर गमावल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या मधुर आवाजाची आठवण सदैव जिवंत राहील. तसेच त्यांनी आशाताईंच्या कुटुंबाला या कठीण काळात धैर्य मिळो, अशी प्रार्थना केली.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

हे ही वाचा - 

IPL मध्ये मोबाईल वाद पेटला! मॅनेजरची घोडचूक, वैभव सूर्यवंशीवर पण होणार कारवाई? काय सांगतो BCCI चा नियम?