Ajinkya Rahane Retirement Video : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक व्हीडिओ पोस्ट करत त्याने आपल्या क्रिकेटच्या प्रवासाला पूर्णविराम दिला. 38 वर्षांचा अजिंक्य गेल्या काही काळापासून भारतीय संघाबाहेर होता. जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

Continues below advertisement

"कॅप 278 आता निरोप घेत आहे..." (Ajinkya Rahane Retirement Video)

अजिंक्यने इंस्टाग्रामवर व्हीडिओ शेअर करत एक अत्यंत संवेदनशील पोस्ट लिहिली आहे. "कॅप 278 आता निरोप घेत आहे. इतक्या वर्षांत तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी कायम ऋणी राहीन," अशा शब्दांत त्याने चाहत्यांचे आभार मानले. व्हीडिओमध्ये बोलताना त्याचा घसा दाटून आला होता. गळ्यात अडकलेला आवंढा, बोलताना अडखळणारे शब्द आणि डोळ्यात घळाघळा आलेले पाणी पाहून लाखो चाहतेही भावुक झाले. "तुम्ही मला कधीच परकं मानलं नाही, नेहमी आपल्या कुटुंबातील एक भाग मानलं," असं म्हणताना अजिंक्यला आपले अश्रू अनावर झाले होते.

Continues below advertisement

मुंबईच्या मैदानातून आपल्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात करणाऱ्या अजिंक्यने कठीण परिस्थितीत भारतीय संघासाठी नेहमीच संकटमोचकाची भूमिका बजावली. परदेशी मैदानांवर, विशेषतः ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत त्याने खेळलेल्या महत्त्वपूर्ण खेळी नेहमीच लक्षात राहतील. त्याच्या या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एका शांत, संयमी आणि अत्यंत आदरणीय पर्वाचा अंत झाला आहे.

6 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले (Ajinkya Rahane Marathi News)

रहाणेने आपल्या कारकिर्दीत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 144 कसोटी डावांमध्ये, रहाणेने 38.46 च्या सरासरीने आणि 49.50 च्या स्ट्राइक रेटने 5077 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याने 26 अर्धशतके आणि 12 शतके झळकावली. त्याची सर्वोच्च धावसंख्या 188 आहे. रहाणेने 6 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपदही भूषवले. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने 4 कसोटी सामने जिंकले, तर 2 सामने अनिर्णित राहिले.

एकदिवसीय सामन्यांमधील रहाणेची कामगिरी 

87 एकदिवसीय डावांमध्ये, या फलंदाजाने 35.26 च्या सरासरीने आणि 78.63 च्या स्ट्राइक रेटने 2962 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 24 अर्धशतके आणि 3 शतके झळकावली. 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रहाणेने 113.29 च्या स्ट्राईक रेटने 375 धावा केल्या.

हे ही वाचा - 

Ajinkya Rahane Retirement : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?