Afghanistan Cricketer Shapoor Zadran hospitalised : अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जादरान (Shapoor Zadran) सध्या दिल्लीतील एका रुग्णालयात जीवन-मरणाशी झुंज देत आहे. 6 फूट 2 इंच उंचीचा शापूर आयसीयूमध्ये दाखल असून तो हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसाइटोसिस(HLH) या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने ग्रस्त आहे. या आजारामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असून संसर्ग त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचला आहे. त्याचे वजन झपाट्याने कमी होत आहे आणि तो जवळपास बोलणेदेखील बंद झाले आहे.

शापूर जानेवारी महिन्यात उपचारासाठी दिल्लीला आला होता. सध्या तो HLH च्या चौथ्या टप्प्यात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याला प्रथम त्रास जाणवला होता. त्यानंतर अफगाणिस्तानातील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी भारतात जाण्याचा सल्ला दिला, अशी माहिती त्याचा धाकटा भाऊ घमाई जादरान यांनी दिली.

वजन कमी झालं, मेंदूपर्यंत पोहोचलेला संसर्ग, वाचा गेली...

ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, MRI आणि CT स्कॅननंतर शपूरच्या मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये क्षयरोगाचाही (टीबी) समावेश होता. सुरुवातीला त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती, पण सुमारे 20 दिवसांनी त्याची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्याला पुन्हा दाखल करावे लागले. अशी परिस्थिती दोनदा घडली. तिसऱ्यांदा प्रकृती अधिकच खालावली आणि तो डेंग्यू पॉझिटिव्ह आढळला. रमजान महिन्यात त्याची बोन मॅरो तपासणी करण्यात आली, त्यानंतर तो HLH च्या चौथ्या टप्प्यावर असल्याचे समोर आले. त्याच्या भावाने सांगितले की, शपूरचे सुमारे 14 किलो वजन कमी झाले आहे. तो फारच कमी बोलतो आणि त्याचा संवाद जवळपास थांबला आहे. (Afghanistan Cricketer Shapoor Zadran Battling For Life admitted to ICU)

स्टेरॉइड्समुळे आशेचा किरण

शापूर हा कुटुंबातील सर्वात मोठा सदस्य असून त्याच्या चार भाऊ आणि सहा बहिणी आहेत. तो दीर्घकाळ कुटुंबाचा आधारस्तंभ राहिला आहे. अलीकडे दिलेल्या स्टेरॉइड्सचा त्याच्यावर सकारात्मक परिणाम दिसत असल्याने कुटुंबाला आशा निर्माण झाली आहे की त्याची प्रकृती हळूहळू सुधारेल.

शापूर जादरानची क्रिकेट कारकीर्द

शापूर जादरान एक वेगवान गोलंदाज होता, ज्याने आपल्या कारकिर्दीत अनेक महान फलंदाजांना बाद केले. तो जगातील प्रत्येक प्रमुख संघाविरुद्ध खेळला. 2009 ते 2019 दरम्यान, त्याने 44 एकदिवसीय आणि 36 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 43 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 37 बळी घेतले. याव्यतिरिक्त, शापूर जादरानने 83 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 90 विकेट्से घेतले.

हे ही वाचा - 

PSL च्या अब्रूचे धिंडवडे! पाकिस्तान क्रिकेटला काळिमा फासणाऱ्या आतापर्यंतच्या 5 लज्जास्पद घटना, नेमकं काय काय घडलं?