Abhishek Sharma Video :मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कप 2026 चा दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. या सामन्यात हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह वगळता टीम इंडियाच्या इतर गोलंदाजांची इंग्लिश फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. विशेषतः अर्शदीप सिंगचा दिवस फारसा खराब राहिला. त्याने चार षटकांत तब्बल 51 धावा दिल्या आणि त्यात पाच वाइड चेंडू टाकले.
भारत-इंग्लंड सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिषेक शर्मा, ईशान किशन, अर्शदीप सिंग आणि संजू सॅमसन टीम बसमध्ये एकत्र दिसत आहेत. दरम्यान, अर्शदीपने अभिषेकच्या फील्डिंगचं कौतुक करत नाइस फील्डिंग असं म्हटलं. यावर अभिषेकने लगेचच त्याची टांग खेचली. अर्शदीपची दिशाहीन गोलंदाजी चिमट्याने घेत अभिषेक म्हणाला की, अर्शदीपला गोलंदाजी करताना दोन विकेटकीपर लागतात, कारण तो खूप वाइड टाकतो.
अभिषेकच्या या टोमण्यानंतर अर्शदीपनेही हसतच संजू सॅमसनकडे वळून विचारलं, “संजू भाई, मग दोन कीपर लावू का?” आणि लगेच ईशान किशनकडे बोट दाखवत म्हणाला की, “आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तर दोन विकेटकीपर आहेतच.” कारण त्या सामन्यात संजू सॅमसन आणि ईशान किशन दोघेही खेळत होते. या मजेशीर संवादाचा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला असून सोशल मीडियावर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
वर्ल्ड कपमध्ये अभिषेकचा फॉर्म चिंतेचा
सध्या सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा फारसा फॉर्ममध्ये दिसत नाही. झिम्बाब्वेविरुद्ध केलेल्या 55 धावांच्या खेळीचा अपवाद वगळता इतर सामन्यांत त्याचा बॅट शांतच राहिला आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही अभिषेकला मोठी खेळी करता आली नाही. तो 7 चेंडूत फक्त 9 धावा करून बाद झाला. त्यामुळे आता अंतिम सामन्यात मोठी खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्याची त्याच्याकडून अपेक्षा आहे. दुसरीकडे अर्शदीप सिंगने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 9 विकेट घेतल्या असून संघासाठी तो महत्त्वाचा गोलंदाज ठरला आहे.
हे ही वाचा -
