Ravi Shastri on Abhishek Sharma T20 World Cup 2026 : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्मा सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी या परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचा सल्ला दिला. शास्त्री यांच्या मते, अभिषेकचे सलग तीन डक हे संघासाठी नकारात्मक नसून उलट सकारात्मक ठरू शकतात. त्यांनी आश्चर्य व्यक्त करत म्हटले की, प्रतिस्पर्धी संघांना याचीच चिंता वाटत असेल की इतका दर्जेदार फलंदाज अजून फॉर्ममध्ये आलेला नाही. कदाचित तो स्पर्धेतील महत्त्वाच्या टप्प्यासाठी आपली सर्वोत्तम खेळी राखून ठेवत असेल. त्यामुळे विरोधी संघ थोडे अस्वस्थ असतील.

प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल अपेक्षित नाही

शास्त्री यांनी स्पष्ट केले की, गतविजेत्या भारताकडे सध्या संतुलित आणि भक्कम प्लेइंग इलेव्हन आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या शेवटच्या गट-सामन्यात भारताने दोन बदल केले होते.

त्या वेळी कुलदीप यादव यांना संधी देण्यात आली, तर अर्शदीप सिंग यांना बाहेर बसावे लागले. तसेच अक्षर पटेल यांना विश्रांती देत वॉशिंग्टन सुंदर यांना खेळवण्यात आले. शास्त्री यांच्या मते, संघासमोर अक्षरला खेळवायचे की वॉशिंग्टनला, याबाबतची खरी कोंडी असेल.

गोलंदाजीतील पर्यायांमुळे संघ अधिक मजबूत

शास्त्री म्हणाले की, भारताकडे आवश्यक ती खोली आणि पर्याय उपलब्ध आहेत. विशेषतः दवाचा परिणाम होत असल्यास अतिरिक्त गोलंदाजाची गरज भासते. अशा वेळी शिवम दुबे, हार्दिक पंड्या पूर्ण कोटा टाकू शकतो, तर तिलक वर्मा एक-दोन षटके टाकण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे संघ व्यवस्थापनाकडे पर्यायांची कमतरता नाही. त्यांच्या मते, मागील सामन्यात उतरलेली टीम संतुलित आणि प्रभावी होती, त्यामुळे त्यात बदल होण्याची शक्यता कमी आहे.

2024 च्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती...

शास्त्री यांनी दक्षिण आफ्रिकेच्या आत्मविश्वासाचेही कौतुक केले. त्यांच्या मते, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे. हा 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप अंतिम सामन्याची पुनरावृत्ती असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिका ही अजिबात हलकी टीम नसून ते जोरदार लढत देतील, असा विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा -

Shikhar Dhawan Marriage : डोक्यावर अक्षता पडल्या, गळ्यात हार घालताच शिखर धवनचं पत्नीसोबत स्टेजवर लिपलॉक, लग्नातील Unseen Video व्हायरल