Abhishek Sharma Unwanted T20I Record : जपानविरुद्धच्या सामन्यात भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माचा डाव पहिल्याच चेंडूवर संपला. गोल्डन डकवर बाद झालेल्या अभिषेकच्या नावावर आता 2026 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सात शून्यांची नोंद झाली आहे. यासोबतच एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या नकोशा विक्रमाची त्याने बरोबरी केली आहे. मंगळवारी सानो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत आणि जपान यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. पावसामुळे हा सामना प्रत्येकी पाच षटकांचा करण्यात आला. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली.

Continues below advertisement

2026 मध्ये सातव्यांदा शून्यावर बाद

मात्र, अभिषेकचा डाव पहिल्याच चेंडूवर संपला. चार्ली हारा-हिंझेच्या गोलंदाजीवर तो शून्यावर बाद झाला. शोमा सुगाया-स्लेटरने त्याचा झेल घेतला. त्यामुळे अभिषेकच्या नावावर या वर्षातील सातवे टी-20 आंतरराष्ट्रीय शून्य नोंदवले गेले. जपानविरुद्धचा गोल्डन डक हा अभिषेकचा 2026 मधील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सातवा शून्य ठरला. यासह त्याने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. यापूर्वी पाकिस्तानचा सायमन अयुब 2025 मध्ये सात वेळा, तर रवांडाचे जॅपी बिमेनिमाना आणि ऑर्किड तुयिसेन्गे 2023 मध्ये प्रत्येकी सात वेळा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर बाद झाले होते.

Continues below advertisement

पाच वेळा गोल्डन डक

अभिषेकसाठी आणखी एक नकोसा आकडा म्हणजे 2026 मध्ये तो तब्बल पाच वेळा पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे. जपानविरुद्धच्या सामन्यातील गोल्डन डक हे त्याचे या वर्षातील पाचवे गोल्डन डक ठरले. म्हणजेच, 2026 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा पहिल्याच चेंडूवर बाद होण्याचा विक्रमही अभिषेकच्या नावावर नोंदवला गेला आहे.

सर्व टी-20 सामन्यांचा विचार केला तर 10 शून्य

सर्व प्रकारच्या टी-20 सामन्यांचा विचार केला, तर 2026 मध्ये अभिषेक शर्मा तब्बल 10 वेळा शून्यावर बाद झाला आहे. एका कॅलेंडर वर्षात टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शून्यांचा हा नकोसा विक्रम ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम 9 शून्यांचा होता. अफगाणिस्तानचा राशिद खान 2019 मध्ये, तर पाकिस्तानचा शादाब खान 2024 मध्ये प्रत्येकी नऊ वेळा शून्यावर बाद झाला होता.

30 चेंडूत शतकही ठोकले

मात्र, 2026 हे वर्ष अभिषेक शर्मासाठी केवळ अपयशाचे राहिलेले नाही. याच वर्षी त्याने अफगाणिस्तानविरुद्ध वादळी फलंदाजी करत अवघ्या 30 चेंडूत शतक झळकावले होते. त्यामुळे जपानविरुद्धच्या गोल्डन डकमुळे अभिषेकच्या नावावर नकोसा विक्रम नोंदला गेला असला, तरी या वर्षात त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने अनेकदा शानदार कामगिरीही केली आहे.

हे ही वाचा -

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! वर्षभरात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर, पाकिस्तानची पिछेहाट, कोणता संघ कितव्या स्थानी?