Abhishek Sharma Asian Games 2026 : 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल 124 धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 169 धावा उभारल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण डाव अवघ्या 45 धावांवर आटोपला. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच श्रीलंकेच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. मात्र सामन्याचा खरा थरार अभिषेक शर्माच्या शेवटच्या षटकात पाहायला मिळाला.

Continues below advertisement

फलंदाजीत अभिषेक अपयशी, पण गोलंदाजीत हिरो

या सामन्यात अभिषेक शर्माकडून फलंदाजीत मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो अवघ्या 7 धावांवर बाद झाला. त्यामुळे फलंदाजीत त्याला आपली छाप पाडता आली नाही. मात्र गोलंदाजीची वेळ आली आणि अभिषेकने आपल्या अवघ्या पाच चेंडूंमध्ये 2 धावा देत 2 विकेट्स घेत सामन्याचा रंगच बदलून टाकला. विशेष म्हणजे, त्याच्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूंमध्ये श्रीलंकेने 3 विकेट्स गमावल्या. 

Continues below advertisement

9 षटकांनंतर श्रीलंका 43/7

भारताने दिलेल्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातीपासूनच दाणादाण उडाली. भारतीय गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक धक्के दिल्याने श्रीलंकेची अवस्था अत्यंत बिकट झाली. 9 षटकांनंतर श्रीलंकेची धावसंख्या 43 धावा आणि 7 विकेट्स अशी झाली होती. त्यानंतर अभिषेक शर्माच्या हातात चेंडू देण्यात आला आणि पुढील पाच चेंडूंमध्येच सामन्याचा निकाल निश्चित झाला.

अभिषेक शर्माच्या एका षटकात श्रीलंका हादरलं (Abhishek Sharma Asian Games 2026) 

अभिषेक शर्माने टाकलेल्या 10व्या षटकात श्रीलंकेच्या डावाचा अक्षरशः शेवट झाला. पहिल्या दोन चेंडूंनंतर तिसऱ्या चेंडूवर थरिंदू रत्नायके धावबाद झाला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर संजू सॅमसनने चमिका करुणारत्नेला यष्टीचीत करत श्रीलंकेला नववा धक्का दिला. आता श्रीलंकेकडे केवळ एक विकेट शिल्लक होती. अभिषेकच्या पाचव्या चेंडूवर बिनुरा फर्नांडो त्रिफळाचीत झाला आणि श्रीलंकेचा डाव अवघ्या 45 धावांवर संपुष्टात आला. अभिषेकच्या या छोट्याशा स्पेलने सामना अक्षरशः एका क्षणात भारताच्या बाजूने झुकवला. फलंदाजीत केवळ 7 धावा करणारा अभिषेक गोलंदाज म्हणून मात्र भारताच्या विजयाचा महत्त्वाचा शिल्पकार ठरला.

फायनलमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने (India vs Pakistan Final Asian Games 2026)

आता अंतिम सामन्यात भारतासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान असेल. सुवर्णपदकासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला 3 ऑक्टोबरला रंगणार आहे. उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेला केवळ 45 धावांत गुंडाळत मिळवलेला हा मोठा विजय आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे. आता सर्वांच्या नजरा भारत-पाकिस्तानच्या अंतिम सामन्याकडे लागल्या आहेत.

हे ही वाचा -

IND vs SL Asian Games : इशानची बॅट तळपली, बुमराह-अक्षर लंकेचा काळ बनून आले! श्रीलंकेला मातीत लोळवून टीम इंडिया फायनलमध्ये, आता पाकिस्तानशी सामना