पणजी : महाराष्ट्राच्या वीरधवल खाडे आणि पलक जोशी यांनी प्रत्येकी दुसरे सुवर्णपदक जिंकून जलतरणामध्ये ‘दुहेरी धमाका’ साजरा केला. या दोन सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने दोन रौप्य व एक कांस्यपदके अशी एकूण पाच पदकांची कमाई केली. ऑलिम्पिकपटू वीरधवलने ५० मीटर्स बटरफ्लाय शर्यत २४.६० सेकंद अशा विक्रमी वेळेत जिंकली आणि २०१५मध्ये त्यानेच नोंदवलेला २४.७३ सेकंद हा विक्रम मोडला. बुधवारी त्याने येथे ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत जिंकून वेगवान जलतरणपटूचा मान मिळाला होता. याच शर्यतीत कांस्यपदक जिंकणारा मिहीर आंम्ब्रेने वीरधवलच्या पाठोपाठ ५० मीटर्स बटरफ्लाय शर्यत २४.६७ सेकंदांत पार करीत रौप्यपदक जिंकले. 


पुरुषांच्या १०० मीटर्स बॅकस्टोक शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋषभ दासने ५७.३७ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. या शर्यतीत ऑलिम्पिकपटू श्रीहरी नटराजन (५५.५९ सेकंद) हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. महिलांच्या १०० मीटर्स शर्यतीत महाराष्ट्राच्या पलक जोशीने सोनेरी कामगिरी केली. तिने हे अंतर एक मिनिट, ०५.२९ सेकंदांत पार केले. याआधी तिने या स्पर्धेत २०० मीटर्स बॅकस्टोक शर्यतीचेही विजेतेपद मिळवले होते. ५० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत मात्र ऋजुता खाडेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने हे अंतर २८.३८ सेकंदांत पार केले. याआधी तिने या स्पर्धेत ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत जिंकली होती. 


वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत दाखल
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पुरुष व महिला या दोन्ही गटांमध्ये विजयी मालिका कायम ठेवत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वॉटरपोलोमधील उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. 
पुरुष गटात महाराष्ट्राने चुरशीच्या लढतीनंतर केरळ संघावर ६-४ अशी मात केली. महाराष्ट्र संघाकडून आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये गौरव महाजनी व पियुष सूर्यवंशी यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. केरळ संघाने शेवटच्या डावात दोन गोल करीत सामन्यात उत्सुकता निर्माण केली होती मात्र महाराष्ट्राने शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवीत सामना जिंकला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा पश्चिम बंगालबरोबर सामना होणार आहे. महिला गटात महाराष्ट्राने कर्नाटक संघावर १५-७ असा दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्र संघाकडून राजश्री गुगळे व पूजा कुंबरे यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची केरळ संघाशी गाठ पडणार आहे. दोन्ही गटांचे उपांत्य सामने शुक्रवारी होणार आहेत.


रीकर्व्हमधील दोन सांघिक पदकांवर महाराष्ट्राची दावेदारी


महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या रीकर्व्ह तिरंदाजी क्रीडा प्रकारात अनुक्रमे सुवर्ण  आणि कांस्य पदकांसाठी दावेदारी मजबूत केली आहे.
गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर चालू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने यजमान गोव्याला ६-० असे नमवले. मग दुसऱ्या सामन्यात आसामचा ६-२ असा पराभव केला. यशदीप भोगे, शुकमनी बाबरेकर,  सुमेध मोहोड, गौरव लांबे यांचा समावेश असलेला महाराष्ट्राचा संघ ६ नोव्हेंबरला झारखंडशी जेतेपदासाठी भिडणार आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाने तेलंगणा संघाला ६-० असा फरकाने हरवले. परंतु हरयाणा संघाकडून हार पत्करावी लागली. मंजिरी अलोने, श्रुष्टी जोगदंड, शर्वरी शेंडे, नक्षत्रा खोडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राची तिसऱ्या क्रमांकासाठीची लढत ६ नोव्हेंबरला होईल. समीर म्हस्के आणि अमर जाधव महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक आहेत.