नवी दिल्ली: वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात कर्णधार विराट कोहलीने द्विशतक झळकावून विक्रम नोंदवला. त्यामुळे 22 जुलैचा दिवस त्याच्यासाठी संस्मरणीयच ठरला. कारण, आयसीसीनेही टी20ची वर्ल्ड रॅकिंग घोषित केली. त्यातही विराटसाठी आनंदाची बातमी मिळाली.

 

आयसीसीने शुक्रवारी टी20 रॅकिंगची घोषणा केली. यातील फलदांजांच्या यादीत विराटने अव्वल स्थान कायम राखले आहे. विराट कोहलीने 837 गुणांनी आपले अव्वल स्थान कायम राखले. तर दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा टी20चा कर्णधार आरोन फिंच विराटपासून केवळ 34 गुणांनी पिछाडीवर आहे.

 

न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गुप्टिल या यादीत 754 गुणांनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय टी20 संघाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल, झिम्बॉब्वे दौऱ्यातील केदार जाधव आणि मंदीप सिंह यांची वर्ल्ड रॅकिंगमधील क्रमवारीमध्ये वाढ झाली आहे.

 

तर दुसरीकडे अफगाणिस्तान संघाचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद शहजाद याने टॉप 10 च्या यादीत स्थान मिळवले आहे. शहजादने थेट नवव्या स्थानी धडक मारली आहे. विशेष म्हणजे, टॉप 10च्या यादीत पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचा समावेश नाही.