दुबई : ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेट पंच क्लेअर पोलोसाकनं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. क्लेअर पोलोसाक पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पंच म्हणून काम पाहणारी जगातली पहिली महिला ठरली आहे.


क्लेअरनं सध्या सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये नामिबिया आणि ओमान संघांमधल्या सामन्यात मुख्य पंच म्हणून भूमिका बजावली. 31 वर्षीय क्लेअरनं याआधी महिलांच्या 15 वन डे सामन्यात तसेच आयसीसीच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातही पंच म्हणून काम पाहिलं होतं.





नोव्हेंबर 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये झालेला वन डे सामना हा क्लेअरच्या अंपायरिंग करिअरमधला पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यानंतर 2018 सालच्या महिला टी 20 विश्वचषकात आणि 2017 च्या महिलांच्या वन डे विश्वचषकातही तिनं पंचांची भूमिका बजावली होती.