ढाका : विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये 800 षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवलाय. अशी कामगिरी करणारा गेल जगातला पहिला खेळाडू ठरला आहे.
बांगलादेश प्रिमियर लीग स्पर्धेत काल ढाका इथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात रंगपूर रायडर्स संघाकडून खेळताना गेलने 51 चेंडूत 116 धावांची तुफानी खेळी केली.
या खेळीत त्याने 6 चौकारांसह तब्बल 14 षटकार ठोकले. गेलने आतापर्यंत 318 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 801 षटकार ठोकले आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यातल्या 103 षटकारांचाही समावेश आहे.
ट्वेंटी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गेलनंतर वेस्ट इंडिजचाच कायरन पोलार्ड (506), न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्युलम (408), वेस्ट इंडिजचा ड्वेन स्मिथ (351) आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (314) यांचा क्रमांक लागतो.