सुरत : आयपीएलच्या दहाव्या पर्वात रॉयल चॅलेंजर बंगळुरुमधील वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलने नवा इतिहास रचला आहे. टी20 मध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठणारा गेल हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
गुजरात लायन्सविरोधात गुजरातच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात गेलने ही कामगिरी बजावली. टी20 क्रिकेटमध्ये 289 सामन्यांच्या 284 डावांमध्ये गेलने दहा हजार धावा ठोकल्या.
आयपीएलमध्ये 96 सामन्यांमध्ये 42.54 च्या सरासरीने गेलने 3 हजार 504 धावा केल्या. यामध्ये पाच शतकं आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे.
टी20 मध्ये 35 सामन्यांत गेलने एक हजार धावांचा टप्पा पार केला होता. पाच हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी त्याला 132 व्या सामन्याची वाट पहावी लागली. तर आता 285 सामन्यांनंतर त्याने दहा हजार धावसंख्या पूर्ण केली.
गेलने टी20 मध्ये सर्वाधिक म्हणजे 18 शतकं केली आहेत. तर त्याच्या नावे विस्फोटक 60 अर्धशतकं आहेत. टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील दीर्घकालीन खेळी (175 धावा) ही गेलच्या नावे जमा आहे.
टी20 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा मानही गेलला मिळाला आहे. टी20 मध्ये ख्रिस गेलने 732 षटकार आणि 759 चौकार लगावले आहेत.
गेलचा विक्रम मोडित काढण्यासाठी इतर फलंदाजांना मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. गेलनंतर ब्रँडन मॅक्युलमचा क्रमांक लागतो. मॅक्युलमने टी20 मध्ये 7 हजार 371 धावा केल्या आहेत.
ख्रिस गेलनं पाच चौकार आणि सात षटकारांची उधळण करुन गुजरात लायन्स विरुद्धच्या सामन्यात 77 धावांची खेळी केली. विराट कोहलीनं 64, ट्रॅव्हिस हेडनं नाबाद 30 आणि केदार जाधवनं नाबाद 38 धावांची खेळी करुन गेलला साथ दिली. त्यामुळेच बंगळुरुला 20 षटकांत दोन बाद 213 धावांची मजल मारता आली.