कोलंबो: श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजनं क्रिकेटच्या तिन्हीही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कसोटीचं कर्णधारपद दिनेश चंदीमलकडे सोपवण्यात आलं आहे. तर वनडे आणि टी-20 मध्ये उपुल थरंगावर कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.

झिम्बाब्वेविरुद्ध पाचव्या आणि अखेरच्या वन डेत श्रीलंकेचा 3 विकेट्सने पराभव झाला. त्यानंतर मॅथ्यूजनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, जेव्हा मॅथ्यूज दुखापतीमुळे संघाबाहेर होता त्यावेळी दिनेश चंदीमल आणि उपुल तरंगा यांनी संघाचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे हा अनुभव त्यांना आता उपयोगी पडू शकतो.

याबाबत बोलताना चंदीमल म्हणाला की, 'मॅथ्यूजनं आमच्यासाठी जे काही केलं आहे त्यासाठी मी त्याचा आभारी आहे. कर्णधार होणं एवढं सोपं नसतं. तो आमच्यासाठी मॅचविनर आहे. मला आशा आहे की, तो यापुढे असाच राहिल.'

मागील काही वर्षात श्रीलंकेचा संघ आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकला नाही. मॅथ्यूजने 34 कसोटी सामन्यांचं नेतृत्व केलं, ज्यापैकी 13 सामन्यात श्रीलंकेला विजय मिळाला, तर 15 सामन्यात पराभव पत्करावा लागला.

संंबंधित बातम्या:
झिम्बाब्वेकडून दारुण पराभव, मॅथ्यूज कर्णधारपदावरुन पायऊतार