कराची : पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल पाकिस्तानचेच माजी कर्णधार आमीर सोहेल यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. एका टीव्ही चॅनलच्या चर्चेदरम्यान ते अप्रत्यक्षरित्या म्हणाले की, पाकिस्तानी संघ मॅच फिक्स करुन फायनलमध्ये पोहोचला आहे.


आमीर सोहेल यांनी एका टीव्ही चॅनलच्या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, "पाकिस्तानचा संघ आणि कर्णधार सरफराज अहमदला अशाप्रकारे आनंद साजरा करायला नको. हा संघ दुसऱ्या कारणांमुळे सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला आहे, आपल्या खेळामुळे नाही." आता या दुसऱ्या कारणांमध्ये त्यांचा इशारा मॅच फिक्सिंगकडे आहे.

"ही सरफराजची कमाल नाही, तर पाकिस्तानच्या संघाला हा सामना दुसऱ्या कोणतरी जिंकून दिला आहे. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की मैदानाच्या बाहेर काय घडतं," असं आमीर सोहेल म्हणाले.

आमीर सोहेल यांनी थेट आरोप केला नसला तरी त्यांच्या या विधानांमुळे हेच अर्थ निघतात.

याआधी सेमीफायनलमध्ये इंग्लंडला पराभूत करुन पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. इंग्लंडच्या लक्ष्याचा सहजरित्या पाठलाग करुन पाकिस्तानने फायनलमध्ये धडक मारली.

10 वर्षानंतर एखाद्या स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान एकमेकांचा मुकाबला करणार आहे. यापूर्वी 2007 मध्ये टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भिडले आहेत, ज्यात भारताने बाजी मारली होती.