नागपूर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची गळाभेट घेण्यासाठी किंवा त्याच्या पाया पडण्यासाठी चाहत्यांनी मैदानावर धावत येण्याची बाब नवी नाही. असाच प्रकार नागपूरच्या व्हीसीए स्टेडियममध्ये घडला. मात्र चाहत्याची फिरकी घेण्यात धोनीही मागे राहिला नाही.

त्याचं झालं असं की, नागपूर वन डेत जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला, तेव्हा धोनीचा एक तरुण चाहता सुरक्षाव्यवस्था भेदून मैदानात घुसला. तो तरुण आपल्या जवळ येत असल्याचं लक्षात येताच धोनीने आधी खो-खोच्या शैलीत त्याला चकवलं. मग धोनीने जी धूम ठोकली की, त्याच्या चाहत्यालाही आपला सारा कस पणाला लावायला लागला. आपल्या चाहत्यावर प्रसन्न झालेला धोनी अखेर स्टम्पजवळ जाऊन थांबला. तेव्हा कुठे त्या तरुण चाहत्याची धोनीचे आशीर्वाद घेण्याची आणि त्याला मिठी मारण्याची इच्छा पूर्ण झाली.


यादरम्यान, धोनी आधी रोहित शर्माच्या मागे लपला. त्यानंतर इतर खेळाडूंमधून मार्ग काढत धोनी पिचवर पोहोचला, चाहताही त्याच्या मागे पिचपर्यंत पोहोचला. यावेळी कर्णधार विराट कोहलीसह इतर खेळाडूंनी तरुणाला रोखण्याचाही प्रयत्न केला. अखेर स्टम्पजवळ थांबलेल्या धोनीचे चाहत्याने आशीर्वाद घेतले आणि त्यावेळी माहीने त्याला मिठी मारली.

महेंद्रसिंह धोनी वयाच्या 37व्या वर्षीही एकेरी-दुहेरी धावा वेगाने वेचण्यात पटाईत आहे. नागपूरच्या दुसऱ्या वन डेदरम्यान धोनीचा तोच वेग आणि तीच चपळाई या निमित्ताने पुन्हा दिसून आली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने सनसनाटी विजय मिळवला. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीला फारशी कमाल करता आली नाही आणि तो शून्यावरच बाद झाला. फिरकीपटू झाम्पाने धोनीला शून्यावर बाद केलं.