चेन्नई: टीम इंडियानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका 4-0नं खिशात घातली. भारताने चेन्नईतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडला १ डाव आणि 75 धावांनी मात दिली.
दरम्यान, या सामन्यात आणि मालिकेत अनेक विक्रम रचले आणि मोडले गेले. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा या पाच खेळाडूंनी ही मालिका अक्षरश: गाजवली.

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं मागील 18 कसोटीपैकी एकही कसोटी गमावलेली नाही. भारतीय क्रिकेटमधील हा एक नवा विक्रम आहे. इतकंच नव्हे तर या वर्षी एकूण 9 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. एका कॅलेंडर वर्षातील भारताचं हे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे. याआधी भारतानं 2010 साली एका वर्षात आठ कसोटी सामने जिंकले होते.

टीम इंडियानं कसोटी क्रिकेटच्या 84 वर्षांच्या इतिहासात भारतानं पहिल्यांदाच इंग्लंडवर 4-0 इतक्या मोठ्या फरकानं विजय साजरा केला आहे. तसंच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतानं एखाद्या संघावर 4-0 अशी मात करण्याची ही दुसरीच वेळ आहे.

2013 साली भारतानं ऑस्ट्रेलियाला 4-0 असं हरवलं होतं. आता विराटच्या टीमनं इंग्लंडला 4-0 असं लोळवलं आहे.  1932 सालापासून भारतीय संघ आजवर 152 कसोटी मालिकांमध्ये खेळला आहे. त्यात केवळ दुसऱ्यांदाच भारतानं 4-0 असा विजय मिळवला आहे.