अफगाणिस्ताननं भारताला विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला विजयासाठी अखेरच्या दोन चेंडूंवर केवळ एका धावेची गरज होती. रवींद्र जाडेजा आणि खलील अहमद यांनी 49.4 षटकांत भारताला बरोबरी साधून दिली. पण रशिद खानच्या पुढच्याच चेंडूवर जाडेजानं मिडविकेटला नजीबुल्लाह झादरानच्या हाती झेल दिला आणि सामना टाय झाला. भारताच्या वन डे इतिहासातला हा आठवा टाय सामना ठरला.
अंपायरच्या निर्णयावर धोनीचा निशाणा
या सामन्यानंतर कर्णधार धोनीने अप्रत्यक्षरित्या पंचांच्या निर्णयावर निशाणा साधला. सामना संपल्यावर प्रेझेंटेशन सेरेमनीदरम्यान रमीझ राजा यांनी धोनीला पराभवाची कारणं विचारली. त्यावर धोनीने अफगाणिस्तानी संघाचं कौतुक केलं, शिवाय भारताकडून झालेल्या काही चुकाही नमूद केल्या. पण त्यावेळी धोनीने अंपायरच्या निर्णयाबाबत सूचक वक्तव्य केलं. मला दंड होईल, त्यामुळे मी काही गोष्टींबाबत खुल्यापणाने बोलणार नाही, असं धोनी हसत हसत म्हणाला.
धोनी म्हणाला, “अफगाणिस्तानने क्रिकेटमध्ये चांगली प्रगती केली आहे. आशिया चषकात त्यांनी चांगली कामगिरी केली, ती कौतुकास्पदच आहे. तो एकमेव देश आहे जो सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारात उत्तम कामगिरी केली”.
मात्र त्याचवेळी धोनीने भारताची जमेची बाजूही सांगितली.
"आम्ही वाईट कामगिरी केली असं मी म्हणणार नाही. आम्ही आमच्या प्रमुख खेळाडूंना आराम दिला होता. बॉल स्विंग होत नसल्यामुळे आमच्या गोलंदाजांना ठराविक टप्प्यावर गोलंदाजी करायला हवी होती. दुसरीकडे आमच्या फलंदाजांनीही चुकीचे फटके निवडले. अनेक ठिकाणी चुकीचे फटके खेळल्याचं दिसून आलं. त्यासोबतच काही रन-आऊट आणि काही अशा गोष्टी झाल्या, ज्याबाबत मी बोलू इच्छित नाही कारण मला दंड भरायचा नाही. त्यामुळे या सामन्यात मॅच टाय होणं हे सुद्धा आमच्यासाठी वाईट बाब नाही, कारण आम्ही किमान हरलो तर नाही”, असं धोनी म्हणाला.
या सामन्यात अंपायरने धोनीला पायचित आऊट दिलं. मात्र धोनीला टाकलेला चेंडू स्टम्पबाहेर जात होता हे रिव्ह्यूमध्ये दिसलं. पण भारताकडे रिव्ह्यू शिल्लक नव्हता. पण अंपायरने चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याने धोनीने नाराजी व्यक्त केली होती. तसाच प्रकार दिनेश कार्तिकच्या बाबतचही झाला होता. त्यामुळे या दोन निर्णयामुळे धोनीने काही न बोललेलंच बरं असं म्हणत अंपायर्सच्या निर्णयावर निशाणा साधला.
संबंधित बातम्या
अफगाणिस्तानची जबरदस्त कामगिरी, भारताविरुद्धचा सामना टाय!