मुंबई : आयपीएलच्या 11व्या मोसमात दिल्ली डेअरडेव्हिल्स नवी टीम आणि नव्या कर्णधारासह मैदानात उतरलं. मात्र, तरीही म्हणावी तशी त्यांची कामगिरी झाली नाही. सहापैकी पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ज्यामुळे गौतम गंभीरनं कर्णधारपद सोडलं. त्यामुळे आता कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरवर सोपवण्यात आली आहे. मात्र, तरीही संघाची समस्या मात्र कायम आहे.
दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला रिटेन केलं होतं. पण नवा मोसम सुरु होण्याआधीच शमी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यामुळे आयपीएलमध्ये म्हणावी तशी छाप त्याला सोडता आली नाही. आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात त्याने फक्त 3 बळी घेतले आहेत. तर प्रति ओव्हर 9 च्या सरासरीने त्याने धावा दिल्या आहेत.
दिल्ली डेअरडेव्हिल्सला शमीकडून अतिशय चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण तो तसं करु शकला नाही. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स याबाबत बोलताना म्हणाला की, 'खासगी आयुष्यातील समस्यांमुळे त्याची कामगिरी खालावली आहे.'
'मला वाटतं की, तो खासगी आयुष्यातील समस्यांशी झगडत आहे. अशावेळी लक्ष केंद्रीत होणं कठीण असतं. मैदानात चांगलं प्रदर्शन करण्याआधी तुम्ही तुमच्या समस्या मिटवण्याचा कायम प्रयत्न करता. पण तसं झालं नाही तर तुमचं मैदानात लक्ष केंद्रीत होत नाही. त्याला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच काही वेळ लागेल. पण हा सीजन त्याच्यासाठी अद्याप संपलेला नाही. अजूनही बरेच सामने शिल्लक आहेत.' असं होप्स म्हणाला.
दरम्यान, शमीची पत्नी हसीन जहाँ हिने त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसात तक्रार केली आहे. तसंच तिने शमीवर मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोपही केले आहेत.
याच दरम्यान, कार अपघातात तो गंभीर जखमीही झाला होता. या सर्व प्रकारामुळे त्याला आयपीएल सुरु होण्याआधी म्हणावा तसा सराव करता आला नाही. त्याचाच परिणाम आयपीएलमधील सामन्यांमध्येही पाहायला मिळत आहे.
...म्हणून शमीचं मॅचमध्ये लक्ष नाही : कोच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Apr 2018 01:51 PM (IST)
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स मोहम्मद शमीबाबत बोलताना म्हणाला की, 'खासगी आयुष्यातील समस्यांमुळे त्याची कामगिरी खालावली आहे.'
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -