मुंबई : जर्मनी आणि भारत यांच्यात फुटबॉलच्या बाबतीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. भारतात अफाट गुणवत्ता असली तरी त्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण, पायाभूत सोयीसुविधा आणि फुटबॉलच्या अचूक अभ्यासक्रमाची नितांत आवश्यकता आहे. हा फरक भरुन काढण्यासाठी आता जर्मनीचा फुटबॉल अभ्यासक्रम भारतात राबवला जाणार आहे. अशाप्रकारचा हा उपक्रम भारतात पहिल्यांदाच राबविला जात आहे.


रोड टू जर्मनी

फुटबॉल क्लब ऑफ इंडिया आणि मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनने (एमडीएफए) फुटबॉल नेक्स्ट फाऊंडेशनच्या सहकार्याने पुढाकार घेतला असून, ‘रोड टू जर्मनी’ हा कार्यक्रम आणला आहे.



बीएमसीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार

या अभ्यासक्रमाद्वारे मुंबई महापालिकेच्या शाळांमधील गुणवान खेळाडूंची निवड करुन त्यांना अद्ययावत प्रशिक्षण दिले जाणार आहे. इतकेच नव्हे तर त्यांना थेट जर्मनीला जाऊन प्रशिक्षणाचे धडे गिरविण्याची संधी मिळणार आहे.

निवड चाचणी सुरु

सध्या मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये निवड चाचणी सुरु असून यातून 12 वर्षांखालील गुणी फुटबॉलपटूंचा शोध घेतला जाणार आहे. त्यातून निवडलेल्या गुणी खेळाडूंच्या तुकडीला जर्मनीत जाऊन फुटबॉलचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. भारतात आल्यानंतरही त्यांना त्याच पद्धतीचे प्रशिक्षण मायदेशातही दिले जाणार आहे. त्यासाठी प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमही राबविला जाणार आहे.



फुवेकोद्वारे प्रशिक्षण

फुटबॉल क्लब ऑफ इंडियाने ‘फुवेको’ नावाचे फुटबॉल डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर तयार केले असून त्याद्वारे विविध क्लब आणि त्यांच्या उभरत्या फुटबॉलपटूंना अद्ययावत असे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

फुवेको हे सॉफ्टवेअर जर्मनीमध्ये विकसित करण्यात आले असून त्यात युवा खेळाडूंच्या प्रशिक्षणाची, फिटनेससंबधी सर्व माहिती या सॉफ्टवेअरमध्ये असेल. मुलांसह त्यांच्या पालकांना आणि प्रशिक्षकांना कोणत्याही क्षणी ऑनलाईनद्वारे ही माहिती पाहता येईल. सध्या हे सॉफ्टवेअर इंग्रजी भाषेत असले तरी हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, पंजाबी, बंगाली या भारतीय भाषांमध्येही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

या कार्यक्रमाला जर्मन वाणिज्य दूतावासाचे डॉ. जर्गन मोरहार्ड, शाल्के या जर्मन फुटबॉल क्लबचे माजी युवा प्रशिक्षक अॅनास्तेशिय गेरासिमोस (माईक), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (विफा) मुख्य कार्यकारी अधिकारी हेन्री मेनेझेस, एमडीएफएचे सचिव उदयन बॅनर्जी, फुटबॉल क्लब ऑफ इंडियाचे कृष्णा पवळे, धरम मिश्रा, इरफान खान आणि सिद्धार्थ सभापती (फुटबॉल क्लब ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य) आणि फुटबॉल नेक्स्ट फाऊंडेशनचे संस्थापक कौशिक मौलिक उपस्थित होते.



जर्मनीप्रमाणेच फुटबॉलमध्येही भारताची प्रगती व्हावी, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. ‘रोड टू जर्मनी’ कार्यक्रम म्हणजे फुटबॉलमध्ये प्रावीण्य असलेल्या देशात जाऊन फुटबॉलचे प्रशिक्षण घेणे. फुटबॉल हा माझा आवडता खेळ असून भारतातील युवा फुटबॉलपटू जर्मनीत जाऊन आल्यानंतर या खेळात आपली चमक दाखवतील, अशी आशा जर्मन वाणिज्य दूतावासाचे डॉ. जर्गन मोरहार्ड यांनी व्यक्त केली.

आठवड्यातून तीन वेळा फुटबॉलचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यूएफाचं सी प्रमाणपत्र असलेल्या प्रशिक्षकांकडूनच आम्ही युवा फुटबॉलपटूंना प्रशिक्षण देणार आहोत. युवा फुटबॉलपटूंना शिक्षणाबरोबरच फुटबॉल प्रशिक्षण आणि जर्मनीची भाषा शिकवली जाणार आहे, असे फुटबॉल नेक्स्ट फाऊंडेशनचे संस्थापक कौशिक मौलिक यांनी सांगितले.



जेव्हा मी लहान होतो, तेव्हा परदेशात जाऊन प्रशिक्षण घेण्याची संधी आम्हाला कधीच मिळाली नाही. आता महापालिका शाळांमधील आणि मध्यमवर्गातील गुणी फुटबॉलपटूंना थेट जर्मनीत जाऊन प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. हा खरोखरच स्तुत्य उपक्रम असून फुवेको हा अभ्यासक्रमही चांगला आहे, असे विफाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेन्री मेनेझेस म्हणाले.