Sanjay Singh Elected New President Of WFI : भाजप खासदार बृजभूषण सिंह (Birj Bhushan) यांचे विश्वासू संजय सिंह (Sanjay Singh) यांची राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या (Wrestling Federation of India) अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. संजय सिंह यांच्या पॅनेलला 40 मतं मिळाली, तर प्रतिस्पर्धी राष्ट्रीय खेळातील पदक विजेती अनिता श्योराण हिला फक्त सात मतं मिळाली. संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी कुस्तीला रामराम ठोकलाय, त्यांनी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. 


संजय सिंह हे मूळचे वाराणसी येथील आहेत. त्यांनी आरएसएससाठी काम केलेय. भाजप खासदार बृजभूषण यांचा विश्वासू म्हणूनही संजय सिंह यांना ओळखले जाते. राष्ट्रीय कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकल्यानंतर संजय यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले "गेल्या सात-आठ महिन्यांत नुकसान झालेल्या देशातील हजारो पैलवानांचा हा विजय आहे." महासंघात सुरू असलेल्या राजकारणाबाबत विचारले असता ते म्हणाले, "आम्ही कुस्तीगीर राजकारणाला राजकारणाने आणि कुस्तीला कुस्तीने उत्तर देऊ."


प्रेमचंद लोचब यांनी दर्शन लाल यांचा पराभव केल्याने अनिता यांच्या पॅनेलला सरचिटणीसपद राखण्यात यश आले. रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचे माजी सचिव लोचब यांनी 27-19 असा विजय मिळवला. राष्ट्रीय महामार्गावर फूड जॉइंट्सची साखळी चालवणारे आणि आंदोलक कुस्तीपटूंच्या जवळचे मानले जाणारे देवेंद्र सिंह कदियान यांनी आयडी नानावटी यांचा 32-15 असा पराभव करून वरिष्ठ उपाध्यक्षपद पटकावले. संजय सिंह यांच्या पॅनलने उपाध्यक्षपदाची चारही पदे जिंकली, दिल्लीचे जय प्रकाश (37), पश्चिम बंगालचे असित कुमार साहा (42), पंजाबचे कर्तार सिंग (44) आणि मणिपूरचे एन फोनी (38) विजयी झाले.






मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांना उपाध्यक्ष निवडणुकीत केवळ पाच मते मिळाली. तो निवडणुकीसाठी आले नाहीत.ब्रिजभूषण यांच्या गटाचे सत्यपाल सिंग देसवाल हे नवे कोषाध्यक्ष असतील. उत्तराखंडच्या देसवाल यांनी जम्मू-काश्मीरच्या दुष्यंत शर्मा यांचा 34-12 असा पराभव केला. कार्यकारिणीतील पाच सदस्य हेही मावळत्या अध्यक्षांच्या गटातील आहेत.


राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीचे निकाल बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक या आघाडीच्या कुस्तीपटूंसाठी  निराशाजनक आहेत, कारण मागील काही महिन्यांपासून ब्रिजभूषण यांच्या विरोधात ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी दिल्लीमध्ये मोठं आंदोलन केले होते. डब्ल्यूएफआयमधील बदलांसाठी त्यांनी आक्रमक प्रचार केला होता पण त्याला कुस्ती जगताचा पाठिंबा मिळाला नाही. साक्षी मलिकसह आघाडीच्या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. देशभरातून विविध स्तरातून त्यांना मोठा पाठिंबा मिळाला होता. पण बृजभूषण यांच्या विश्वासू संजय सिंह यांचा विजय झाल्यानंतर साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी कृस्ती कायमची सोडण्याचा निर्णय घेतला. 


आम्ही जिंकू शकलो नाही. पूर्ण भावनेने आम्ही लढाई लढलो. पण महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषणसारख्या व्यक्ती, त्यांचा सहकारी जिंकून येत असेल, तर मी माझ्या कुस्तीचा त्याग करते, यापुढे मी कुस्तीच्या मैदानात दिसणार नाही. देशवासियांना धन्यवाद! असे वक्तव्य साक्षी मलिक हिने कुस्तीला रामराम ठोकल्यानंतर म्हणाली.