नवी दिल्ली : बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर आयपीएलमधील संघ सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला. नव्या कर्णधाराची लवकरच घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सनरायझर्स हैदराबाद संघाचे सीईओ के शन्मुगम यांनी दिली.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने बॉल टॅम्परिंग केली. याची आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची कर्णधार आणि उपकर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात आली.

राजस्थान रॉयल्सने यापूर्वीच स्मिथकडून कर्णधारपद काढून घेतलं आहे. त्याच्या जागी कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली.

वॉर्नर, स्मिथच्या आयपीएलमधील सहभागाबाबत सस्पेंस

वॉर्नर आणि स्मिथची आयपीएलमधील भूमिका त्यांच्या बंदीच्या निर्णयावर अवलंबून असेल. त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी बीसीसीआयची आहे, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी म्हटलं आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणातील दोषींना पुढच्या 24 तासात शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यानंतर या दोघांच्या आयपीएलमधील सहभागाबाबत निर्णय होऊ शकतो.