लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा मुकाबला करण्याअगोदर श्रीलंकेच्या अडचणी वाढत असल्याची चिन्हं आहेत. कारण श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज आणि आणि गोलंदाज चामरा कपुगेदेरा अनफिट असल्याची माहिती आहे.


मांडीचे स्नायू दुखावल्यानंतर मॅथ्यूज पुनरागमन करत आहे. या सामन्यात तो गोलंदाजी करु शकणार नाही. त्यामुळे संघाला त्याचं मोठं नुकसान होणार आहे, अशी माहिती श्रीलंकन संघाचे व्यवस्थापक असांका गुरुसिन्हा यांनी दिली.

भारताविरुद्धच्या सामन्यात मॅथ्यूज खेळणार आहे. मात्र तो केवळ फलंदाजी करु शकेल. अनफिट असल्यामुळे त्याला गोलंदाजी करता येणार नाही. मात्र कपुगेदेराच्या बाबतीत आत्ताच काहीही सांगता येणार नाही, असंही गुरुसिन्हा यांनी स्पष्ट केलं.

गुडघ्याच्या दुखापतीमुळे कपुगेदेरा अनफिट आहे. त्याच्याऐवजी संघाकडे पर्याय आहेत. कारण श्रीलंकेच्या ताफ्यात सध्या 17 खेळाडू आहेत. धनुष्का गुणातिलक आणि ऑफ स्पिनर दिलरुवान परेरा हे पर्याय असतील, असं गुरुसिन्हा यांनी सांगितलं.

पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा दुसरा सामना 8 जूनला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकल्यास भारत उपांत्य फेरीत प्रवेश करेल. या अगोदर अ गटातून इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सलग दुसरा विजय मिळवून उपांत्य फेरीचं तिकीट बूक करण्याची संधी आता भारताकडे आहे.