Sania Mirza Australian Open News : सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.  उपांत्य फेरीत भारताच्या जोडीनं ग्रेट ब्रेटनच्या नील स्कूप्स्की आणि यूएसएच्या देसीरा क्रॉज्जिक या जोडीचा पराभव केला. सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी 7-6(5) 6-7(5) 10-6 या फरकाने सामना जिंकत फायनलमध्ये धडक मारली आहे. 


टेनिस स्टार सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना  यांनी उपांत्य सामन्यात आक्रमक सुरुवात केली होती. या जोडीनं पहिला सेट 7-6 च्या फरकानं नावावर केला होता. पण दुसऱ्या सेटमध्ये ग्रेट ब्रेटनच्या नील स्कूप्स्की आणि यूएसएच्या देसीरा क्रॉज्जिक या जोडीने दणक्यात पुनरागमन केलं. रोमांचक झालेल्या दुसऱ्या सेटमध्ये सानिया आणि रोहन यांना 6-7 च्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला.  दुसरा सेट गमावल्यानंतर भारताच्या जोडीनं जोरदार पलटवार केला. अखेरच्या तिसऱ्या सेटमध्ये सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी  नील स्कूप्स्की आणि देसीरा क्रॉज्जिक या जोडीला संधी दिली नाही. भारताच्या जोडीनं 10-6 च्या फरकानं तिसरा सेट एकतर्फी जिंकला. या विजयासह सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियान ओपनच्या मिश्र दुहेरी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 






सानिया मिर्जानं याआधीच टेनिस विश्वातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही ग्रँड स्लॅम स्पर्धा तिची अखेरची स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर विजयानं करिअरचा शेवट करण्याचा मानस सानिया मिर्जाचा असेल.  दरम्यान, उपांत्य पूर्व सामन्यात जेलेना ओस्टापेंको आणि डेविड वेगा हर्नांडेज यांच्या जोडीनं माघार घेतल्यामुळे बाय मिळाला होती. उपांत्य पूर्व फेरीत पोहचण्यासाठी सानिया आणि रोहन या भारताच्या जोडीनं उरुग्वे आणि जापानच्या एरियल बेहार आणि मकाटो निनोमिया या जोडीचा 6-4, 7-6 (11-9) अशा फरकानं पराभव केला होता.  उपांत्य फेरीत भारताच्या स्टार जोडीनं विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली आहे. 






आतापर्यंत फक्त एका सेटमध्येच पराभव -
 
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीमध्ये सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना या जोडीनं फक्त एक सेट गमावला आहे. उपांत्य फेरीत त्यांना एका सेटमध्ये पराभव पाहावा लागला. याचा अपवाद वगळता मिश्र दुहेरी स्पर्धेत सानिया आणि रोहन बोपन्ना यांना एकाही सेटमध्ये पराभव झाला नाही.