Hyrox Champion: चीनमधील बीजिंग येथे आयोजित 'हायरॉक्स' (Hyrox) या प्रसिद्ध इनडोअर फिटनेस स्पर्धेदरम्यान एक अस्वाभाविक घटना घडली. शर्यतीदरम्यान ऑस्ट्रेलियन ॲथलीट जोआना विएत्रझिक (Joanna Wietrzyk) हिची प्रकृती अचानक बिघडल्याने तिचा शारीरिक ताबा सुटला आणि कपड्यांमध्येच शौचाला (मल विसर्जन) झाले. मात्र, तरीही तिने शर्यत थांबवण्याऐवजी ती पूर्ण केली. या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि आयोजकांच्या निष्काळजीपणावर तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याचा वाद निर्माण झाल्यानंतर जोआना विएत्रझिक हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या प्रकाराबद्दल मनापासून माफी मागितली आहे. "त्या वेळी मी स्पर्धेतून माघार घ्यायला हवी होती. माझ्या या निर्णयामुळे ज्यांना त्रास झाला, त्या सर्वांची मी माफी मागते. बीजिंगमधील नागरिक, माझे सहकारी खेळाडू, प्रेक्षक आणि आयोजकांची मी क्षमा मागतो," असे तिने म्हटले. तसेच, टीकेनंतर जोआनाने या स्पर्धेत मिळालेले आपले विजेतेपदही सोडण्याची तयारी दर्शवली आहे.
Hyrox Champion: नेमकं काय घडलं?
ऑस्ट्रेलियन खेळाडूने 'हायरॉक्स' स्पर्धेत कपड्यांमध्ये शौचाला झाल्यानंतर थांबण्याऐवजी ती स्पर्धा सुरू ठेवल्याबद्दल सर्वांची माफी मागितली आहे. एवढंच नाही, तर या स्पर्धेत मिळालेलं आपलं जेतेपदही ती सोडायला तयार आहे. स्पर्धा सुरू असतानाच तिची प्रकृती अचानक बिघडली आणि तिच्या नकळत कपड्यांमध्ये शौचाला झाली. 'हायरॉक्स' ही एक इनडोअर फिटनेस स्पर्धा आहे. या स्पर्धेत धावणे आणि ताकदीवर आधारित विविध व्यायामांचा एकत्रित समावेश असतो.बीजिंगमध्ये झालेल्या या इनडोअर फिटनेस स्पर्धेतील घटनेबद्दल जोआना विएत्रझिकने 'मनापासून माफी' मागितली आहे. त्या वेळी आपण स्पर्धेतून माघार घ्यायला हवी होती, अशी कबुली तिने सोशल मिडीयावरती पोस्ट करत दिली आहे.
Hyrox Champion: आयोजक 'हायरॉक्स'ची माफी आणि टीका
या प्रकरणात खेळाडूला वेळेत न थांबवल्यामुळे आयोजक 'हायरॉक्स'वर जोरदार टीका होत आहे. 'हायरॉक्स'च्या नियमांनुसार थुंकणे, कचरा टाकणे किंवा पाण्याचा गैरवापर यावरही दंड आकारला जातो; मग अशा गंभीर प्रसंगी अधिकाऱ्यांनी तिला ट्रॅकवरून बाहेर का काढले नाही, असा प्रश्न उपस्थित केला गेला. यावर 'हायरॉक्स'चे सहसंस्थापक मोरित्झ फ्यूर्स्टे यांनी माफी मागितली असून, जैविक अस्वच्छता आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या नियमावलीत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. सोबतच, सोशल मीडियावर जोआनाला धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करत भविष्यातील स्पर्धा बंदी घालण्याचा इशाराही आयोजकांनी दिला आहे.
Hyrox Champion: वैद्यकीय दृष्टिकोन: कशामुळे घडतो असा प्रकार?
अशा अत्यंत उच्च क्षमतेच्या (High-Intensity) शर्यतींमध्ये ॲथलीट आपल्या शरीराला शेवटच्या मर्यादेपर्यंत पुश करतात. हायड्रेशन किंवा पचनसंस्थेवर पडणाऱ्या दबावामुळे ही समस्या उद्भवते, ज्याला वैद्यकीय भाषेत 'रनर डायरिया' (Runner's Diarrhea) म्हटले जाते. तीव्र व्यायामादरम्यान फुफ्फुसे आणि हृदयाकडे रक्ताचा पुरवठा वेगाने वाढतो. यामुळे पचनसंस्थेकडे होणारा रक्तप्रवाह कमी होऊन आतड्यांची हालचाल अचानक वाढते. परिणामी, पोटात कळ येणे किंवा अचानक मलत्यागाची तीव्र इच्छा निर्माण होते.
दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलच्या स्पोर्ट्स इंज्युरी विभागातील असोसिएट प्रोफेसर डॉ. राहुल ग्रोवर यांच्या मते, स्पर्धेपूर्वी खूप कमी किंवा जास्त पाणी प्यायल्यास ही समस्या उद्भवते ॲथलीट्सने सरावाच्या वेळीच (Trial Run) आपल्या खाण्यापिण्याच्या आणि पाण्याच्या वेळा निश्चित केल्या पाहिजेत. तसेच, शर्यतीदरम्यान तीव्र पोटदुखी, चक्कर किंवा टॉयलेटची आणीबाणी आल्यास काही मिनिटे थांबणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरते.
Hyrox Champion: काय आहे 'हायरॉक्स' स्पर्धा?
२०१७ मध्ये जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरातून सुरू झालेली 'हायरॉक्स' ही एक लोकप्रिय इनडोअर फिटनेस स्पर्धा आहे. या स्पर्धेत ॲथलीट्सना एकामागोमाग एक किलोमीटर धावावे लागते आणि त्यानंतर रोइंग मशीन, स्लेज पुश, बर्पी जंप, मेडिसिन बॉल थ्रो आणि सँडबॅग खांद्यावर घेऊन लंज करणे यांसारखे कठीण व्यायाम करावे लागतात.
