Asian Para Games 2023 : सध्या सुरु असलेल्या आशियाई पॅरा खेळ (Asian Para Games 2023) मध्येही भारतीय खेळाडूंनी जगासमोर आपली छाप पाडली आहे. आशियाई पॅरा खेळ स्पर्धेत आजच्या दिवशी भारताच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची पदकाची कमाई केली आहे. अॅथलेटिक्समधील पुरुषांच्या उंच उडी-T63 स्पर्धेत शैलेश कुमारने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं. तर, याचं स्पर्धेत मरियप्पन थांगावेलूने रौप्य पदक जिंकलं. शैलेशने 1.82 मीटर अंतर गाठून सुवर्णपदक पटकावले आणि पुरुषांच्या उंच उडी-T42 मध्ये त्याने सुवर्णपदकावर नाव कोरलं. तर, मरियप्पनचं सुवर्ण 0.2 मीटरने हुकलं. 1.80 मीटर मारल्याने मरियप्पनला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.


निषाद कुमारची सुवर्ण कामगिरी


चीन (China) मधील हांगझोऊ येथे चौथ्या आशियाई पॅरा गेम्सचे आयोजन करण्यात आलं असून त्यात भारताची चमकदार कामगिरी पाहायला मळत आहे. आतापर्यंत भारताने तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह एकूण 9 पदके जिंकली आहेत. सोमवारी, 23 ऑक्टोबर 2023 रोजी, भारताच्या निषाद कुमारने पुरुषांच्या उंच उडी T-47 प्रकारात 2.02 मीटर अंतर पार करून, आशियाई क्रीडा स्पर्धेचा विक्रम मोडून आणि ऐतिहासिक विजयाची नोंद करत सुवर्णपदक पटकावलं






पुरुषांच्या थ्रो बॉल स्पर्धेत तिन्ही पदकं


आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो F51 स्पर्धेत, प्रणव सुरमाने सुवर्ण पदक जिकलं आहे. पुरुषांच्या थ्रो बॉल स्पर्धेमध्ये प्रणव सुरमा, धरमबीर आणि अमित सिरोहा यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक जिंकत भारताच्या खात्यात तीन पदकं जोडली. सुरमाने 30.01 मीटर थ्रो करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. यासोबत धरमबीर (28.76m) आणि अमित कुमार (26.93m) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावलं. 






दोन सुवर्ण पदकांसह आतापर्यंत नऊ पदकांची कमाई


मोनू घंगासने पुरुषांच्या शॉटपुट एफ 11 स्पर्धेत 12.33 मीटर फेक करत कांस्यपदक पटकावलं. महिला कॅनोई VL2 स्पर्धेत भारताच्या प्राची यादवने रौप्य पदक जिंकलं. चौथ्या आशियाई पॅरा खेळ स्पर्धेत भारताने आतापर्यंत 9 पदकांची कमाई केली आहे. आशियाई पॅरा खेळ स्पर्धेच्या 17 खेळांमध्ये 303 भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत.