जकार्ता : एशियाडमधील अॅथलेटिक्स प्रकारात भारताच्या हिमा दास आणि मोहम्मद अनासनं रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. हिमानं महिलांच्या 400 मीटर शर्यतीत 50.79 सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदकाची कमाई केली. तर मोहम्मद अनासनं पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत 45.69 वेळेसह दुसरं स्थान मिळवलं.


महिलांच्या 400 मीटर शर्यतीत बहरीनच्या सल्वा नासिरने 50.09 सेकंदात शर्यत पूर्ण करत सुवर्ण पदक पटकावलं. एशियाडमध्ये हा नवा विक्रम आहे. कझाकिस्तानच्या एलिना मिखिनाने 52.63 सेकंदात शर्यत पूर्ण करत कास्य पदक पटकावलं. भारताची निर्मला या शर्यतीत चौथ्या स्थानावर राहिली. निर्मलाने ही शर्यत 52.96 सेकंदात पूर्ण केली.


पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत कतारच्या हसन अब्देलाहने सुवर्ण पदक तर बहरीनच्या अली खमीसने कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं.


भारताचा धावपटू गोविंदन लक्ष्मणनने पुरुषांच्या 10 हजार मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे. तामिळनाडूच्या गोविंदनचं एशियाड स्पर्धेतील हे पहिलं पदक आहे.


भारताला एकूण 36 पदकं
भारत या स्पर्धेत 36 पदकांसह नवव्या स्थानावर आहे. यामध्ये सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि 20 कांस्य पदकांचा समावेश आहे.