Asia Cup Points Table 2022 : टीम इंडिया आणि अफगाणिस्तान संघानं आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. पण आतापर्यंत उर्वरित दोन संघाचं स्थान पक्कं झालेलं नाही. दोन जागांसाठी चार संघामध्ये लढत होणार आहे. आज, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये करो या मरोचा सामना होणार आहे तर शुक्रवारी पाकिस्तान आणि हाँककाँग यांच्यामध्ये लढत होणार आहे. विजेता संघ सुपर 4 मध्ये पोहचणार आहे तर पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येईल. 

आशिया चषकाच्या गुणतालिकेत दोन्ही ग्रुपमध्ये आतापर्यंत एका एका संघानं आपलं स्थान पक्कं केलेय. ग्रुप अ मध्ये भारतीय संघानं दोन्ही सामने जिंकत अव्वल स्थान पटकावलेय. तर ग्रुप ब मध्ये अफगाणिस्तान संघाने दोन्ही संघांचा पराभव करत पहिल्या स्थानावर कब्जा मिळवलाय. भारताने पाकिस्तान आणि हाँककाँगचा पराभव केला तर अफगाणिस्थानने बांगलादेश आणि श्रीलंका यांना धूळ चारली. हाँककाँगपेक्षा चांगला रनरेट असल्यामुळे ग्रुप अ मध्ये पाकिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण हाँगकाँग आणि पाकिस्तान यांच्यातील विजेता संघ सुपर -4 साठी पात्र ठरणार आहे. दुसरीकडे श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये करो या मरोची लढत होणार आहे. शुक्रवारी आशिया चषकातील सुपर 4 मध्ये पोहचणाऱ्या चारही संघाची स्थिती नक्की होईल.  बांगलादेश आणि श्रीलंका दोन्ही संघ कमकुवत आहेत. गेल्या काही दिवसांतील दोन्ही संघाची कामगिरी खराब राहिली आहे. बांगलादेश संघाला मागील 16 टी 20 सामन्यापैकी 14 मध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. तर श्रीलंका संघाला मागील 14 टी 20 सामन्यात 10 पराभवाचा सामना करावा लागलाय. दरम्यान, श्रीलंका आणि बांगलादेश संघ टी 20 मध्ये आतापर्यंत 12 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये श्रीलंका 8 तर बांगलादेश चार वेळा जिंकलाय. पण मागील तीन सामन्याचा विचार करता बांगलादेशनं दोन सामन्यात बाजी मारली आहे तर श्रीलंका संघाला फक्त एक विजय मिळवता आलाय. 

पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान मुकाबला? भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा एकदा लढत होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने हाँगकाँगचा पराभव केल्यास सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. सुपर 4 मध्ये असणाऱ्या संघाचा प्रत्येकाबरोबर सामना होणार आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि भारत यांच्या पुन्हा एकदा सामना होण्याची शक्यता आहे. हा सामना रविवारी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय दोन्ही संघामध्ये फायनल होण्याची शक्यताही काही क्रीडा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.