दुबई : आशिया चषकाच्या निमित्ताने रोहित शर्मा पहिल्यांदाच मोठ्या व्यासपीठावर टीम इंडियाचं नेतृत्त्व करणार आहे. या आशिया चषकात टीम इंडियासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे ते नऊ दिवसांच्या कालावधीत पाकिस्तानशी तीनवेळा होणारा सामना.

साहजिकच फलंदाज आणि कर्णधार या नात्याने रोहित शर्मावर दुहेरी दडपण आहे. रोहितच्या सुदैवाने त्याच्या हाताशी महेंद्रसिंग धोनीसारखा दिग्गज शिलेदार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत वाढलेल्या जबाबदारीचा ताण रोहितवर येऊ नये म्हणून धोनी प्रयत्न करत आहे.

भारतीय संघाच्या नेट्समध्ये प्रत्येक फलंदाजावर लक्ष ठेवण्याची आणि त्याला सूचना करण्याची जबाबदारी धोनीने स्वीकारली आहे. भारताचा आशिया चषकातील सलामीचा सामना नवख्या हाँगकाँगशी होत असला तरी त्यानंतर लगेचच पाकिस्तानशी टक्कर होणार आहे.

धोनीने जबाबदारी घेत खेळाडूंना टिप्स देणंही सुरु केलं आहे. नेट्समध्ये तो खेळाडूंना टिप्स देताना दिसून आला. एवढंच नाही, तर धोनी सरावादरम्यान फलंदाजांच्या सरावावरही लक्ष ठेवणार आहे.

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील लढतीने आशिया चषकाची सुरुवात झाली आहे. भारताचा पहिलाच सामना हाँगकाँगशी, तर 19 तारखेला पाकिस्तानविरुद्ध मुकाबला आहे.