दुबई : आशिया चषकाच्या निमित्तानं भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी चार दिवसांनी पुन्हा आमनेसामने येत आहेत. आशिया चषकाच्या सुपर फोर साखळीत भारत आणि पाकिस्तान संघांमधला सामना उद्या खेळवण्यात येणार आहे.


आशिया चषकाच्या सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशचा सात विकेटने पराभव केला, तर पाकिस्तानही अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे फायनलचं तिकीट मिळवायचं असेल, तर पाकिस्तानला हरवावंच लागेल.


रोहित शर्माच्या टीम इंडियानं प्राथमिक साखळीत पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. त्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. पण त्या निकषावर पाकिस्तानला कमी लेखण्याची चूक टीम इंडिया करणार नाही.


आशिया चषकामध्ये सर्वच भारतीय खेळाडूंनी आपलं योगदान दिलं आहे. सलामीचे फलंदाज रोहीत शर्माने सलग दोन अर्धशतकं ठोकली आहेत तर शिखर धवनने आशिया चषकमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत.


मधल्या फळीत अंबाती रायडू, दिनेश कार्तिकमध्ये संघाला गरजेच्या वेळी चांगली खेळी करण्याची क्षमता आहे. महेंद्रसिंग धोनीनेही शुक्रवारी बांगलादेशविरोधात 33 धावा केल्या. तर दुसरीकडे केदार जाधवने ऑलराउंडरची भूमिका चोख बजावली आहे.


महत्त्वाचं म्हणजे, बऱ्याच वेळानंतर संघात परतलेल्या रवींद्र जाडेजानं संधीचं सोनं केलं आहे. जाडेजानं बांगलादेशविरुद्ध चार विकेट घेत सामना एकतर्फी केला होता. भारतीय जलद गोलंदाजीची जबाबदारी भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह यांच्या खांद्यावर आहे.


पाकिस्तानच्या वन डे क्रिकेटमधला बाऊन्स बॅकचा आजवरचा इतिहास हा टीम इंडियाला आश्चर्याचा धक्का देणारा ठरला आहे. त्यात पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर मात करून आपण टीम इंडियाचा पुन्हा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे.


आशिया चषकाच्या साखळीत पाकिस्ताननं टीम इंडियाकडून स्वीकारलेल्या लाजिरवाण्या पराभवासाठी, प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी फलंदाजांना जबाबदार धरलं आहे. पाकिस्तानी फलंदाजांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडली नाही, असा ठपका त्यांनी ठेवला होता.


आर्थर यांच्या मते, पाकिस्तानच्या सहापैकी चार प्रमुख फलंदाजांनी त्यांना दिलेली भूमिका सोडून खेळ केला. त्यामुळेच पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं नव्हतं.