नवी दिल्ली : टीम इंडियाचा सर्वात अनुभवी गोलंदाज आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. होमग्राऊंड असलेल्या फिरोज शाह कोटला मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टी-20 सामन्यानंतर तो निवृत्ती जाहीर करणार आहे.


बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना या निर्णयाबाबत आशिष नेहराने माहिती दिली आहे. आयसीसी 2018 मध्ये टी-20 विश्वचषकाचं आयोजन करणार नाही. त्यामुळे चांगली कामगिरी करत असलेल्या युवा खेळाडूंना संधी देणं जास्त योग्य राहिल, असं नेहराने म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन वन डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. यातील टी-20 सामना 1 नोव्हेंबरला दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात होणार आहे. हेच मैदान नेहराचं होमग्राऊंडही आहे.

नेहराने 2011 च्या विश्वकप विजेत्या आणि 2003 साली विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणाऱ्या भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. नेहराने 19 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 साली कसोटीत पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत 17 कसोटी, 120 वन डे आणि 26 टी-20 सामने खेळले आहेत.

संबंधित बातमी : आशिष नेहरा होम ग्राऊंडवर निवृत्तीची घोषणा करणार?