मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या तीन वन डे आणि तीन ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघांची निवड उद्या मुंबईत होणार आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील सीनियर निवड समितीच्या याच बैठकीत भारताचा वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीचा कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.


दिल्लीचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन तंदुरुस्त असल्यास, इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या निमित्तानं त्याला भारतीय संघात पुनरागमनाची संधी मिळू शकते. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे अनुभवी फलंदाज अजूनही दुखापतीतून सावरलेले नाहीत. त्यामुळं लोकेश राहुलच्या साथीनं शिखर धवनला सलामीला खेळण्यासाठी भारतीय संघात संधी मिळू शकते.

अजिंक्य रहाणेच्या अनुपस्थितीत करुण नायरलाही मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघात हक्काचं स्थान मिळू शकतं. करुण नायरनं इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत त्रिशतक झळकावल्यानं, भारतीय संघाच्या निवडीत त्याचं नाव आघाडीवर आहे.