मुंबई : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेला वेस्ट इंडिजच्या आणखी एका दौऱ्यासाठी मुदतवाढ मिळण्याची चिन्हं आहेत. कारण सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या त्रिसदस्यीय सल्लागार समितीने कुंबळेच्या भवितव्याविषयी निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयकडून आणखी अवधी मागून घेतला आहे.

अनिल कुंबळेच्या मुख्य प्रशिक्षकपदाची मुदत चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संपणार आहे. पण त्याला मुदतवाढ देण्यास कर्णधार विराट कोहलीचा विरोध असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बीसीसीआयने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज मागवले असून, या निवड प्रक्रियेत कुंबळेलाही थेट सहभागी होण्याची संधी आहे.

दरम्यान, बीसीसीआयच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनीही कुंबळेला प्रशिक्षकपदावरून दूर करण्यास विरोध केला आहे. त्यात सचिन, सौरव आणि लक्ष्मणच्या सल्लागार समितीनेही कुंबळेच्या भवितव्याविषयी निर्णय घेण्यासाठीही आणखी अवधी मागून घेतला आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळेच विंडीज दौऱ्यावर जाईल, अशी चिन्हं आहेत.