कॅण्डी: दुसऱ्या वन डेत भारताचा दम काढणारा श्रीलंकन फिरकीपटू अकिला धनंजय हा हळदीच्या अंगाने मैदानात उतरल्याचं आता समोर आलं आहे. धनंजयचं नुकतंच 23 ऑगस्टला लग्न झालं आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल तो भारताविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यासाठी मैदानात उतरला.

23 वर्षीय अकिला धनंजयने या सामन्यात कमाल केली. त्याने सहा विकेट घेऊन टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललं. धनंजय हा श्रीलंकेसाठी हिरो ठरला, मात्र महेंद्रसिंह धोनी आणि भुवनेश्वर कुमार यांनी टिच्चून फलंदाजी केल्याने, श्रीलंकेला विजय मिळवता आला नाही.

भारताने हा सामना तीन विकेट्स राखून जिंकला.



मात्र या सामन्यात धनंजयने केलेल्या केलेल्या गोलंदाजीमुळे त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. धनंजयने 10 षटकात 54 धावा देत 6 विकेट्स घेतल्या.

यामध्ये रोहित शर्मा, के एल राहुल, विराट कोहली, केदार जाधव, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे.

के एल राहुल, विराट कोहली, केदार जाधव या तिघांना तर त्याने एकाच षटकात बाद केलं.

24 तासांपूर्वी लग्न

या सामन्याच्या 24 तासांपूर्वी धनंजयचं लग्न झालं. कोलंबोत 23 ऑगस्टला गर्लफ्रेंड नताली तेक्षीनीसोबत त्याने लगीनगाठ बांधली.

धनंजयची कारकीर्द

धनंजयने कालची मॅच धरुन एकूण 4 वन डे सामने खेळले आहेत. कालच्या भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने 3 सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या. त्यात कालच्या 6 विकेट्सची भर पडल्याने आता त्याच्या खात्यात 4 सामन्यात 11 विकेट्स जमा झाल्या आहेत.



धनंजय आयपीएलमध्येही खेळला आहे. 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्याला 10.50 लाख रुपयांत खरेदी केलं होतं. त्याचे वडिल व्यवसायाने सुतार आहेत.

धनंजयने 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून वन डे पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याला 5 वर्ष बाहेर बसावं लागलं.