2017 मध्ये बॉक्सिंग डे कसोटीत जेव्हा कूकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 244 धावांची खेळी केली, तेव्हा त्याचं जगभरात कौतुक झालं. पण एका वर्षातच चित्र बदललं. यावर्षात कूकने नऊ कसोटी (भारताविरुद्ध साऊदम्पटन कसोटीपर्यंत) सामने खेळले आहेत, मात्र एकही शतकी खेळी करता आलेली नाही. यावर्षी त्याने 16 डावांमध्ये 18.62 च्या सरासरीने केवळ 298 धावा केल्या, ज्यात एका अर्धशतकीय (70 धावा) खेळीचा समावेश आहे.
या खराब कामगिरीमुळे कूकची सरासरी गेल्या आठ वर्षात पहिल्यांदाच 45 च्या खाली आली आहे. भारताविरुद्ध 2006 मध्ये शतकी खेळीने करिअरची सुरुवात करणाऱ्या कूकची सरासरी 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 235 धावांची नाबाद खेळी केल्यापासून 45 च्या खाली कधीही आली नाही.
एकापाठोपाठ एक सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम बनवणाऱ्या कूकने आतापर्यंत 160 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 12254 धावा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या कूकवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेचंच बोलायचं झालं, तर कूकने आठ डावांमध्ये 13, 0, 21, 29, 17, 17 आणि 12 अशी खेळी केली आहे. त्याची सरासरी केवळ 18.05 एवढी आहे. कूकच्या फलंदाजीला नवं वळण देणारे इंग्लंडचे माजी कर्णधार ग्राहम गूचही कूकच्या कामगिरीने हैराण आहेत. त्याच्या खेळात कोणतीही सुधारणा होत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.