Aamer Jamal : पर्थमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा एक नवा वेगवान गोलंदाज उदयास आला. आमेर जमाल (Aamer Jamal) असे या वेगवान गोलंदाजाचे नाव आहे. पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात आमेरने एकूण 6 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विशेष म्हणजे आमिरची ही पदार्पणाची कसोटी आहे. त्याने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात अशी कामगिरी करून सर्वांना चकित केले आहे. या 27 वर्षीय वेगवान गोलंदाज आमेरने डेव्हिड वॉर्नर आणि पर्थमधील ट्रॅव्हिस हेडसारख्या आघाडीच्या फलंदाजांपासून शेपटीच्या सर्व फलंदाजांना तंबूत धाडले.
आमेरने 20.2 षटके टाकली आणि 111 धावा देत 6 बळी घेतले. सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा होत आहे. अशीही चर्चा होत आहे कारण काही काळापूर्वी हा खेळाडू टॅक्सी चालवून आपला घरखर्च भागवत असे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आमेरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आमेर त्याच्या संघर्षाचे दिवस आठवताना दिसत आहे. तो म्हणतो की त्याला शालेय जीवनापासूनच क्रिकेटचे वेड आहे आणि त्यात करिअर करण्यासाठी त्याने टॅक्सीही चालवली आहे.
पाकिस्तान अंडर-19 संघाकडून खेळला
आमेर सांगतो की तो अभ्यासात खूप हुशार होता. त्यामुळेच तो थोडा अभ्यास करून परीक्षेला बसायचा. त्याला फक्त क्रिकेटर व्हायचे होते. त्यामुळे अभ्यासावर जास्त लक्ष न देता तो शाळेपासून दिवसातून तीन वेळा क्रिकेट खेळायला जायचा. तो पाकिस्तानच्या अंडर-19 संघाचाही सदस्य होता.
सकाळ संध्याकाळ टॅक्सी चालवणे, रात्रंदिवस क्रिकेटचा सराव करणे
आमेरने सांगितले की, पाकिस्तान संघात संधी न मिळाल्याने तो काही काळ ऑस्ट्रेलियात क्लब क्रिकेटही खेळला. पाकिस्तानवरील प्रेमामुळे तो पुन्हा आपल्या देशात कसा परतला आणि संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत राहिला हेही त्याने सांगितले. या काळात तो कुटुंबातील मोठा मुलगा असल्याने त्याच्यावर कमाईचा दबावही होता. अशा परिस्थितीत तो सकाळ-संध्याकाळ ठराविक वेळेत टॅक्सी चालवून घरखर्च भागवत असे आणि उरलेला वेळ क्रिकेटचा सराव करत असे.
आमिर म्हणतो की पाकिस्तान संघात स्थान मिळणे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण त्याने त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आमिरने गेल्या वर्षीच पाकिस्तानसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गोलंदाजीसोबतच तो फलंदाजीही उत्तम करतो.
पाकिस्तानचे जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, पर्थ कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाचा डाव 487 धावांवर संपुष्टात आला. यानंतर पाकिस्ताननेही हुशारीने फलंदाजी करत 2 गडी गमावून 132 धावा केल्या. पाकिस्तानच्या आघाडीच्या फळीतील तिन्ही फलंदाजांनी योगदान दिले. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 5 विकेट गमावून 346 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी मिचेल मार्श आणि अॅलेक्स कॅरी यांनी डाव पुढे नेला. 411 धावांवर ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट पडली. अॅलेक्स कॅरी (34) याला आमेर जमालने बोल्ड केले. यानंतर आमेर जमालने मिचेल स्टार्क (12), पॅट कमिन्स (9) आणि नॅथन लियॉन (5) यांनाही झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर मिचेल मार्श (90) खुर्रम शहजादचा बळी ठरला. कांगारूंचा संपूर्ण संघ दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला 487 धावांत आटोपला. पाकिस्तानकडून आमेर जमालने 6 विकेट घेतल्या.
इतर महत्वाच्या बातम्या