जयपूर : टी-20 क्रिकेटमध्ये नेहमीच नवीन विक्रम रचले जातात. पण एका 15 वर्षाच्या मुलानं टी-20 क्रिकेटमध्ये एक असा विक्रम रचला आहे की ज्यानं सगळेच अचंबित झाले आहेत. जयपूरमधील एका टी-20 सामन्यात चार षटकामध्ये दहाही बळी घेण्याचा विक्रम आकाश चौधरी या युवा खेळाडूनं केला आहे. त्यानं स्थानिक टी-20 सामन्यात हा कारनामा केला.

आकाशची गोलंदाजी एवढी भन्नाट होती की त्यानं आपल्या चारही षटकात एकही धाव दिली नाही. सामना संपल्यानंतर त्याचा स्पेल 4 ओव्हर 4 मेडन आणि 10 बळी असा होता. भारताकडून अनिल कुंबळेनं एका कसोटी सामन्यात एका डावात 10 बळी घेण्याचा विक्रम केला होता. पण फक्त 4 षटकात 10 बळी घेणं हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम ठरला आहे.



जयपूरमध्ये खेळवण्यात येणाऱ्या स्वर्गीय भंवर सिंह मालिकेत डावखुरा वेगवान गोलंदाज आकाशनं ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वनडे किंवा टी-20 मध्ये आतापर्यंत अशी कामगिरी कुणीही करु शकलेलं नाही.

जयपूरमधील या मालिकेत पर्ल अकॅडमीनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे फलंदाजीला आलेल्या दिशा क्रिकेट अकॅडमीनं 20 षटकात 156 धावा केल्या. पण त्यानंतर मैदानावर जे काही झालं त्यानं सर्वच हैराण झाले. आकाशनं पर्ल अकॅडमीच्या संपूर्ण संघाला अवघ्या 36 धावांवर ऑल-आऊट केलं.

आकाशनं पहिल्या षटकात दोन बळी घेतले. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्येही दोन-दोन बळी घेतले. तर चौथ्या आणि त्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये त्यानं उरलेल्या चारही जणांना बाद केलं. यावेळी त्यानं हॅटट्रिक देखील घेतली. पर्लचे तब्बल सात फलंदाज हे शून्यावर बाद झाले.