राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शुभम कुमार असे या तरुणाचे नाव आहे. मुख्यमंत्र्यांचा ताफा रविवारी रात्री ठाण्याहून मुंबई येत असताना, वांद्रे वरळी सी लिंकवर पोलीस वाहतूक नियमन करत होते.मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी सी-लिंकवरील ७ आणि ८ या मार्गिका रिकाम्या करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना संबंधित तरुणाला सहाव्या लेनमधून जाण्यास वाहतूक पोलिसांनी सांगितलं. मात्र त्याने सातव्या लेनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घेतली. त्यानंतरही तरुण मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे गाडी चालवत होता. वरळी सी लिंक इथे थांबण्याचा इशारा करुनही तरुण थांबला नाही. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवलं, चौकशीत त्याने तो अभिनेता असल्याचे सांगितलं. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.