विराटला नव्या विक्रमाची चाहूल, सचिनला मागे टाकणार?
आयसीसी कसोटी फलंदाजी रेटिंग्जमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली 895 गुणांसह दुसऱ्या क्रमांवर आहे. मात्र, यावेळी त्याच्याकडे मोठी संधी आहे.
येत्या 23 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरोधात चार सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु होत आहे. यावेळी सगळ्यांच्या नजरा कोहलीकडे असतील, कारण त्याच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद होण्याची शक्यता आहे.
क्रिकेटच्या इतिहासात भारतासाठी 900 हून अधिक रेटिंग्ज केवळ माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. गावसकर यांनी 1979 मध्ये 916 गुणांवर झेप घेतली होती. विराटकडे ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात संधी आहे की, 900 गुण पार करुन गावसकरांचा विक्रमही मोडित काढणं.
इंग्लंडविरोधात 4-0 ने सीरीज जिंकल्यानंतर बांगलादेशविरोधातीलही एका कसोटीत 208 धावांनी विजय संपादन करुन टीम इंडियाने आपली विजयी वाटचाल सुरुच ठेवली आहे. टेस्ट रँकिंगमध्ये 2 नंबरवर असलेल्या ऑस्ट्रेलियाविरोधात टीम विराट लढत देणार आहे. सलग सर्वाधिक सामन्यांमध्ये विजयी राहण्याचा विक्रम सुनील गावसकर यांच्या नावावर होता. तो विक्रम मोडून विराट टीमने सलग 19 टेस्टमध्ये विजय मिळवला आणि आपल्या नावावर विक्रम नोंदवला.
सध्याच्या टेस्ट रँकिंगमध्ये विराटच्या पुढे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आहे. स्टिव्हला 937 गुण आहेत.
गावसकरांसोबतच सचिन तेंडुलकरही सध्या विराटच्या पुढे आहे. सचिनने त्याच्या करिअरमध्ये कधीच 900 गुण मिलवले नाहीत. सचिन आतापर्यंत 898 गुणांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे विराट सचिनच्या गुणांपासून केवळ 3 गुण दूर आहे.