एक कूपन घ्या आणि कोणत्याही हॉटेलमध्ये खा!
कोझीकोड... उत्तर केरळातील टुमदार आणि खऱ्या अर्थात स्मार्ट शहर... शहर मुळात खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध...पण आता लक्षात राहायला लागलं आहे ते जिल्हाधिकाऱ्यांच्या एका महत्वकांक्षी उपक्रमामुळे...
कोझीकोड हे कदाचित एकमेव असं शहर असेल जिथे माणूस उपाशी झोपत नाही.. प्रोजेक्ट सुलेमणी हा उपक्रम लोकसहभागातून जिल्हाधिकारी प्रशांत नायर यांनी सुरू केला. 1 कूपन घेऊन नागरिक कोणत्याही हॉटेलमध्ये सन्मानानं जगू खाऊ शकेल. ही त्यामागची मूळ कल्पना.
या उपक्रमासाठी कुणाकडून मोठी देणगी घेतली जात नाही. ना पोश्टरबाजी केली जाते. ज्याला-त्याला वाटेल तेवढी रक्कम हॉटेलमध्ये असलेल्या सुलेमणी बॉक्समध्ये टाकली जाते.
सरकारी बाबूच्या कचाट्यात न सापडलेला हा प्रयोग खऱ्या अर्थानं कोझिकोड स्मार्ट करतो.
शहरात विविध सरकारी कार्यालयात कूपन वाटपाची सोय आहे. भूक लागलेली कोणतीही व्यक्ती इथे जाऊन कूपन मोफत घेऊ शकते आणि त्या-त्या झोनच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवू शकते. कूपन देताना ना त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती बघितली जाते, ना जात ना पात. व्यक्ती भूकेली असते एवढं कारण पूरेसं असतं
इट विथ डिग्निटी... सुलेमणीचा हा गाभा आहे. लोकांना भीक नकोय, उपकार नको. सरकारी फाईल्समध्ये अडकलेल्या योजनांच्या पलिकडे जाऊन प्रोजेक्ट सुलेमणी नारिकांना सन्मान देतो.