तुमची आमची एसटी झाली 68 वर्षांची!
प्रत्येकाचा आदर करणारी अशी एसटी सेवा आहे. ज्येष्ठ, महिला, लहान मुले अशा प्रत्येकासाठी एसटी आरक्षण देते. एस.टी. ने गेल्या 68 वर्षात सर्वसामान्यांच्या मनात आपलं महत्वाचं स्थान निर्माण केलं आहे. प्रवासासाठी गरिबांच्या हक्काचं साधन अशी एस.टी.ची ओळख बनली आहे.
सर्व सामान्यांच्या प्रवासाचं हक्काचं साधन म्हणजे एसटी.. महाराष्ट्र राज्य परिवहन खात्याअंतर्गत येणाऱ्या एसटी ची सुरुवात होऊन आज 68 वर्ष पूर्ण होत आहेत.
महाराष्ट्रासह शेजारील राज्यात महाराष्ट्र शासनाच्या एकूण 16 हजार बसेस चालतात. यामध्ये जवळपास 70 लाख प्रवासी नियमित प्रवास करतात. तर एकूण 12 हजार कर्मचारी प्रवाशांच्या सेवेत आहेत. सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेड्यात एसटी पोहोचली आहे.
एसटी ची सेवा सुरु झाल्यानंतर 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा अंतर्गत बसेस चालवल्या जाऊ लागल्या. महाराष्ट्राचं एसटी महामंडळ हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठी बस सेवा देणारं महामंडळ आहे.
पुणे ते अहमदनगर या मार्गावर पहिली एसटी धावली होती. प्रवाशांना या प्रवासासाठी 9 पैसे एवढे शुल्क मोजावे लागले होते.
एसटी प्रवासी वाहतुकिसोबतच इतर सेवाही देते. सर्वसामान्यांना कमी शुल्कात मालाची वाहतूक करता यावी यासाठी पार्सल सेवा आहे. एस.टी. कडून वृत्तपत्र, औषधी, विद्यार्थी यांचीही वाहतूक केली जाते. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून एसटीची ओळख आहे.
आजपासून 68 वर्षांपूर्वी म्हणजे 1948 साली पहिली एसटी धावली होती.
खाजगी वाहतूकीला टक्कर देण्यासाठी एसटीने अनेक वातानुकुलित सेवा सुरु केल्या आहेत. यामध्ये 'शिवनेरी', मल्टी एक्सेल 'अश्वमेध' सेवा आणि निमआराम वातानुकुलित 'शितल' ही सेवा सुरु केली आहे.