रनमशिन पृथ्वी शॉची कारकीर्द
पृथ्वी शॉ हा अवघा 17 वर्षांचा आहे. 1999 मध्ये जन्मलेल्या पृथ्वी शॉने लहानपणापासूनच क्रिकेटविश्वास लक्ष वेधून घेतलं आहे.
पृथ्वी शॉनं 174 चेंडूंत 13 चौकार आणि एका षटकारासह 120 धावांची खेळी उभारली.
त्यानं प्रफुल्ल वाघेलाच्या साथीनं सलामीला 90 धावांची, श्रेयस अय्यरच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची आणि मग सूर्यकुमार यादवच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी रचली.
पृथ्वी शॉनं वैयक्तिक शतक झळकावलंच, पण पहिल्या तीन विकेट्ससाठी तीन भागिदाऱ्या रचून त्यानं मुंबईला विजयपथावर नेलं.
मुंबईच्या पृथ्वी शॉनं तामिळनाडूविरुद्ध रणजी पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला असून, त्याच्या या कामगिरीनं मुंबईला रणजी करंडकाच्या फायनलचं तिकीटही मिळवून दिलं आहे. त्यामुळं यंदाच्या मोसमात मुंबई आणि गुजरात संघांमध्ये रणजी करंडकाचा अंतिम सामना पाहायला मिळेल.