असं आहे भाजपचं नवं हायटेक हेडक्वार्टर!
ऑगस्ट 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन झालं होतं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्व राजकीय पक्षांना त्यांची कार्यालयं ल्युटन्स दिल्लीच्या बाहेर स्थलांतरित करायची आहेत. दीनदयाल उपाध्याय मार्गावर 2 एकराच्या परिसरात भाजपने हे नवीन मुख्यालय उभारलं आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त अशा या पाच मजली इमारतीत एकूण 70 खोल्या असणार आहेत. एकाचवेळी 400 वाहनांच्या पार्किंगची सोय असेल. या बांधकामात hollow bricks चा वापर करुन इमारतीचं वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, तर वीजेसाठी सोलर पॅनेलचा वापर करण्यात आला आहे. वॉटर हार्वेस्टिंग, बायोटॉयलेटसचा समावेश करुन पर्यावरणाची काळजी घेतल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या मुख्यालयाचा पत्ता आता 11 अशोका रोड ऐवजी 6, दीनदयाल उपाध्याय मार्ग असा होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं आहे.
या कार्यक्रमाला लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. अवघ्या 16 महिन्यांत या पाच मजली अत्याधुनिक इमारतीचं काम पूर्ण करण्यात आलं आहे.
भाजपच्या या नव्या मुख्यालयात एकाचवेळी 600 लोक बसू शकतील अशा दोन कॉन्फरन्स रुमही असतील. वायफाय, एलिव्हेटर, टीव्ही मुलाखतींसाठी स्टुडिओ, डिजिटल लायब्ररी अशा सर्व सोयींनी युक्त असं हे मुख्यालय असेल. त्यामुळे 2019 साठी भाजपची वॉर रुम आता 11, अशोका रोडवरुन 6, दीनदयाल उपाध्याय मार्गावर असणार हे आता निश्चित झालं आहे.