किसान मार्च मुंबईकडे रवाना, खोळंब्यामुळे बारावीचे विद्यार्थी अडकले
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांसह नगर, मालेगावमधून पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांसह, पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिष्टाईचा प्रयत्न केल्यानंतरही किसान सभेचे नेते आंदोलनावर ठाम आहेत. शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.
दरम्यान सरकार शेतकऱ्यांना आज लेखी आश्वासन देण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावर तोडगा निघू शकतो.
त्याआधी काल गिरीश महाजन यांच्याशी आमदार जे पी गावित यांनी चर्चा केली. मात्र लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. मोर्चेकरी शेतकऱ्यांनी कालची रात्र नाशिक-मुंबई महामार्गावरच घालवली.
किसान लाँग मार्चचा फटका बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. मोर्चा निघाल्याने ठिकठिकाणी पोलिसांनी वाहतूक थांबवल्याने अनेक परीक्षार्थी आणि शिक्षक, सुपरवायझर अडकले आहेत.
किसान मार्च सुरु होताच मुंबई नाका परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हजारो आंदोलक मोर्चात सहभागी झाले आहेत.