जिओचा फोन कसा आहे, तुमच्या हातात कधी पडणार आणि सुविधा काय?
भारतीय आता गांधीगिरी नाही, तर डेटागिरी करतील, असं मुकेश अंबानी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जिओ सिम लाँच केल्यानंतर म्हणाले होते. आता 15 ऑगस्टपासून भारतीयांना डिजीटल स्वातंत्र्य मिळेल, असं अंबानी म्हणाले.
एवढंच नव्हे, तर जिओ फोनधारकांना आता मोबाईलवरील फीचर्स त्यांच्या टीव्हीवरही मिळतील. जिओने हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. 309 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्ही तुमचा जिओ फोन टीव्हीशी कनेक्ट करु शकता. त्यामध्ये तुम्हाला जिओचे सर्व चॅनल्स पाहायला मिळतील, जे जिओ टीव्ही मध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये बहुतांश चॅनल्सचा समावेश आहे.
जिओ फोन ग्राहकांच्या हातात कधी पडणार? : जिओचा फीचर फोन 15 ऑगस्टपासून उपलब्ध होईल. यासाठी 24 ऑगस्टपासून प्री बूकिंग करता येईल. त्यामुळे जो अगोदर बूक करणार त्यालाच हा फोन अगोदर हातात पडणार आहे. सप्टेंबरपासून हा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल.
मात्र त्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 1500 रुपये ठेवावे लागतील. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील.
जिओ फोनसाठी प्लॅन : जिओ फोनमध्ये तुम्हाला डेटा वापरण्यासाठी महिन्याला केवळ 153 रुपये मोजावे लागतील. यामध्ये व्हॉईस कॉलिंग, मेसेजस आणि अनलिमिटेड डेटा मिळेल.
या फोनचा देशभरातील 50 कोटींपेक्षा अधिक फीचर फोनधारकांना फायदा होणार आहे.
या फोनमधून तुम्हाला सर्व डिजीटल पेमेंट करता येतील. शिवाय तुमचं बँक खातं आधार, पॅन यांच्याशी लिंक करता येणार आहे.
हा फोन व्हॉईस कमांडिंग असणार आहे. ज्यामुळे तुम्हाला की पॅडचा वापर करण्याची गरज नाही.
रिलायन्सने जिओप्रमाणे आज आणखी एक धमाका केला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा 4G VoLTE फीचर फोन लाँच केला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा फोन फुकटात मिळणार आहे.