मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मास्टरप्लॅन
या बुलेट ट्रेन मार्गावर वांद्रे, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती ही 12 स्टेशन्स असणार आहे.
यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, 351 किमी गुजरातमधून आहे
मुंबई अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावेल.
सध्या बुलेट ट्रेनला 10 डब्बे असतील, ज्यामध्ये सुमारे साडेसातशे प्रवासी एकाचवेळी प्रवास करु शकतील. दररोज एका बाजूने 35 ट्रेन धावतील. दररोज जवळपास 36 हजार प्रवासी प्रवास करतील. सध्या बुलेट ट्रेनचं तिकीट 2700 ते 3000 रुपये असेल.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बीकेसीत बुलेट ट्रेनचं स्टेशन असेल. तिथून अवघ्या तासाभरात टेक्स्टाईल आणि डायमंड हब असलेल्या सूरतला पोहोचता येईल.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटी रुपये खर्च नियोजित असून, यासाठी जपाननं 88 हजार कोटीचं कर्ज दिलं आहे. हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. तर बुलेट ट्रेन हे पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे.
भारताच्या बुलेट ट्रेनच्या सुरक्षेची हमी आम्ही घेऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक किर्तीचे आणि दूरदृष्टी असलेले नेते आहेत. भारत आणि जपान सोबत आल्याने सर्व काही शक्य होईल, असा विश्वास जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी व्यक्त केला.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं भूमिपूजन केलं. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे भारताच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.