ICC World Cup 2019 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने रचलेले 10 विक्रम
विश्वचषक 2019 मध्ये रविवारी (16 जून) झालेल्या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानला 89 धावांनी पराभूत केलं. विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सातवा विजय आहे. पिच पाहून अंदाज लावला जात होता की, पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण शेवट होता होता, आपला निर्णय चुकल्याची जाणीव पाकिस्तानला झाली. या सामन्यात भारताने पाकिस्तानविरोधात दहा विक्रम बनवले आहेत, ते पाहूयात
इंग्लंडमध्ये भारतातर्फे सर्वाधिक शतक करण्याच्या बाबतीत रोहित शर्माने शिखर धवनची बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर आता प्रत्येकी चार शतकं जमा झाली आहेत.
विश्वचषकात भारताविरुद्ध गोल्डन डकवर आऊट होणारा शोएब मलिक हा दुसरा पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे.
सचिन तेंडुलकरला मागे टाकत विराट कोहली हा वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिनच्या 276 डावांच्या तुलनेत 222 डावांमध्ये हा विक्रम प्रस्थापित केला.
सौरव गांगुलीच्या 17 षटकारांचा विक्रम मागे टाकत रोहित शर्मा हा इंग्लंडमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय खेळाडू बनला आहे.
विराट कोहली हा विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार बनला आहे.
इंग्लंडमध्ये सर्वात जलद एक हजार एकदिवसीय धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत रोहित शर्माने शिखर धवनला मागे टाकलं आहे. रोहित शर्माने हा पराक्रम केवळ 18 डावांमध्ये केला आहे.
रोहित शर्मा आणि केएल राहुलने पाकिस्तानविरुद्ध 136 धावांची भागीदारी केली. त्यामुळे विश्वचषकात पाकिस्तानविरोधात कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करणारी जोडी ठरली आहे.
विश्वचषकात पाकिस्तानविरोधात 89 धावांनी विजय हा भारताचा आतापर्यंत सर्वात मोठा विजय ठरला आहे.
भारतीय संघाने विश्वचषकाच्या इतिहातास पाकिस्तानला विक्रमी सात वेळा पराभूत केलं आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर विश्वचषकात पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच चेंडूत विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे.